Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या "पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी."

'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या "पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी."


पुणे: नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित भूमिका अभिनेत्री दीपाली सय्यद साकारणार असल्याची चर्चा आहे. यावर आता रुपाली चाकणकर यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
रुपाली चाकणकर यांनी सांगितले की, अशोक खरात प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीवर आधारित पात्र चित्रपटात दाखवायचे असल्यास संबंधित व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, चित्रपट निर्मात्यांनी आपली कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे चित्रपटाशी संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर पावले उचलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अशोक खरात प्रकरणानंतर आपल्यावर आणि आपल्या कुटुंबीयांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याचेही चाकणकर यांनी म्हटले. या आरोपांमुळे आपल्या मुलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला.
यासंदर्भात त्यांनी आशा मिरगे यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र ती स्वीकारण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यामध्ये रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया आणि आशा मिरगे यांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
रुपाली चाकणकर यांनी 10 जुलै रोजी दिल्ली उच्च न्यायालयात स्वतः हजर राहणार असल्याचे सांगितले. तसेच काही यूट्यूब चॅनेल्सविरोधातही न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपट आणि त्यावरून सुरू झालेला वाद सध्या राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.