यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेत अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळा सुरू असताना मुख्याध्यापिका अस्ताव्यस्त अवस्थेत झोपलेल्या आढळल्याचा आरोप करत शाळा व्यवस्थापन समितीने गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकून संबंधित शिक्षिकेची तातडीने बदली करण्याची मागणी केली.
तक्रारीनुसार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर वासुदेव ढोके यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर त्याने "मॅडम शाळेत झोपल्या आहेत," अशी माहिती दिली. ढोके शाळेत जाऊन पाहिले असता संबंधित मुख्याध्यापिका खरंच झोपलेल्या अवस्थेत आढळल्या. याचवेळी त्यांच्या पतीने, शिक्षक नसतानाही, मुख्याध्यापकांच्या खुर्चीवर बसून मद्यधुंद अवस्थेत पालकांशी अरेरावी आणि दमदाटी केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षिका रुजू झाल्यापासून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थीसंख्या दोन्हीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांचे प्रवेश नेर येथील इतर शाळांमध्ये घेतले आहेत. संबंधित शिक्षिका नियमितपणे वेळेत शाळेत उपस्थित राहत नसल्याचा आणि याबाबत जाब विचारणाऱ्यांना धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीशी संबंधित एसआयआरची जबाबदारीही त्यांनी पार पाडली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वटफळी केंद्राचे केंद्रप्रमुख घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. मात्र, तोपर्यंत संबंधित शिक्षिका पतीसह तेथून निघून गेल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांनी तक्रार प्राप्त झाल्याची पुष्टी केली आहे. संबंधित प्रकरणाची प्राथमिक दखल घेण्यात आली असून, सोमवारी शिक्षिकेविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करून वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याआधी त्यांची तात्पुरती बदली करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.