ओमानहून एक अतिशय धक्कादायक आणि काळजाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये 'जीएफएस गॅलेक्सी' या व्यापारी कंटेनर जहाजावर झालेल्या भीषण क्षेपणास्त्र हल्ल्यात बेपत्ता झालेले पुण्याचे मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला आहे.
त्यांच्या कुटुंबीयांनीही या वृत्तास दुजोरा या अत्यंत दुःखद वृत्ताला दुजोरा दिला आहे. या घटनेमुळे करमरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून पुण्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तो शेवटचा मेसेज ठरला...
मिळालेल्या माहितीनुसार, हेरंब करमरकर हे 'जीएफएस गॅलेक्सी' या जहाजावर तिसरे इंजिनिअर (Third Engineer) म्हणून कार्यरत होते. जहाजावर हल्ला होण्यापूर्वी काही काळ आधीच हेरंब यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. "आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली आहे," असा दिलासा देणारा मेसेज त्यांनी घरच्यांना पाठवला होता. पण त्यानंतर काही वेळातच जहाजाच्या इंजिन रूमवर क्षेपणास्त्र हल्ला झाला. या हल्ल्यामुळे जहाजाला भीषण आग लागली आणि हेरंब यांचा कुटुंबीयांशी असलेला संपर्क कायमचा तुटला.
10 भारतीयांना वाचवण्यात यश
ज्या वेळी हा हल्ला झाला, तेव्हा जहाजावर एकूण 24 खलाशी उपस्थित होते, ज्यामध्ये 11 भारतीयांचा समावेश होता. या भीषण हल्ल्यानंतर बचाव पथकाने तातडीने कारवाई करत 10 भारतीय खलाशांना सुखरूप वाचवण्यात यश मिळवले. पण या बचाव कार्यात हेरंब करमरकर बेपत्ता होते. अनेक दिवसांच्या अथक शोधानंतर अखेर त्यांच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून हल्ल्याचा निषेध
या हल्ल्याची भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने अत्यंत तीव्र शब्दांत निंदा केली आहे. तसेच ओमानमधील भारतीय दूतावास शोध आणि बचाव कार्यासाठी तसेच पुढील प्रक्रियेसाठी स्थानिक प्रशासनाशी सतत समन्वय साधून आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापारी जहाजांवर होणारे असे हल्ले तत्काळ थांबवण्यात यावे, असे आवाहनही भारताकडून करण्यात आले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.