अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने मौद्रिक धोरणाचा आढावा घेण्यासाठी स्थापन केलेल्या विशेष टास्क फोर्समध्ये माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांची नियुक्ती केली आहे. भारतीय वंशाच्या तीन तज्ज्ञांचा या समित्यांमध्ये समावेश करण्यात आला असून, जागतिक आर्थिक क्षेत्रात भारतासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्वने आपल्या मौद्रिक धोरणाचा आढावा घेण्यासाठी पाच विशेष टास्क फोर्सची स्थापना केली असून, या समित्यांमध्ये भारतीय वंशाच्या तीन नामांकित तज्ज्ञांची निवड करण्यात आली आहे. माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन, हार्वर्ड विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ राज चेट्टी आणि मायक्रोसॉफ्टच्या वरिष्ठ अधिकारी आशा शर्मा यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.
अमेरिकेच्या फेडरल रिझर्वचे नवे अध्यक्ष केविन वार्श यांच्या नेतृत्वाखाली या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. मौद्रिक धोरण अधिक प्रभावी आणि आधुनिक बनवण्यासाठी कम्युनिकेशन, बॅलन्स शीट पॉलिसी, डेटा, प्रॉडक्टिव्हिटी अँड जॉब्स आणि इन्फ्लेशन फ्रेमवर्क अशा पाच महत्त्वाच्या क्षेत्रांवर या समित्या काम करणार आहेत. माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांची बॅलन्स शीट पॉलिसी टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती फेडरल रिझर्वच्या विद्यमान बॅलन्स शीट धोरणाचा खर्च, लाभ आणि त्याच्या परिणामांचा सखोल अभ्यास करणार आहे.
जागतिक अर्थव्यवस्था आणि मौद्रिक धोरणातील त्यांच्या अनुभवाचा या समितीला मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हार्वर्ड विद्यापीठातील प्रख्यात अर्थतज्ज्ञ राज चेट्टी यांचा डेटा टास्क फोर्समध्ये समावेश करण्यात आला आहे. आर्थिक निर्णयांसाठी वापरल्या जाणाऱ्या डेटाची गुणवत्ता, अचूकता आणि वेळेत उपलब्धता सुधारण्यावर ही समिती भर देणार आहे. रिअल-टाइम डेटा, आर्थिक असमानता आणि रोजगार बाजारावरील त्यांच्या संशोधनामुळे ते या क्षेत्रातील आघाडीचे तज्ज्ञ मानले जातात.
दरम्यान, मायक्रोसॉफ्टच्या वरिष्ठ अधिकारी आशा शर्मा यांची प्रॉडक्टिव्हिटी अँड जॉब्स टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI आणि नव्या तंत्रज्ञानाचा रोजगार, उत्पादकता आणि अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार आहे. भारतीय वंशाच्या या तीन तज्ज्ञांची अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये झालेली निवड ही भारतासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. जागतिक आर्थिक धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या या समित्यांमध्ये त्यांचे योगदान आगामी काळात महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.