🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली हादरली! तब्बल १०० हून अधिक फायली 'गायब'; महापालिकेत दोन खुल्या भूखंडांचा थेट 'बाजार'!

सांगली हादरली! तब्बल १०० हून अधिक फायली 'गायब'; महापालिकेत दोन खुल्या भूखंडांचा थेट 'बाजार'!


सांगली : गुंठेवारी नियमितीकरणाच्या शंभराहून अधिक मूळ फायली नगररचना विभागाच्या कुपवाड कार्यालयातून गहाळ झाल्याचा तसेच वानलेसवाडी येथील एका सर्व्हे नंबरमधील महापालिकेच्या सहा-सहा गुंठ्यांच्या दोन खुल्या भूखंडाचे गुंठेवारी प्रमाणपत्र काढून त्यांची संगनमताने विक्री झाल्याचा आरोप बुधवारी गुंठेवारी समितीच्या बैठकीत झाला.

गुंठेवारीसंदर्भातील २०२० च्या कायद्याचा फायदा घेऊन गुंठेवारी नियमितीकरणाच्या नावावर बिल्डर लॉबीकडून प्लॉटिंगचा उद्योग सुरू असल्याचा आरोपही झाला. या सर्व प्रकरणांची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, असे आदेश गुंठेवारी समिती सभापती लक्ष्मी सरगर यांनी दिले.

महापालिकेत बुधवारी गुंठेवारी समितीची सभा झाली. सभापती लक्ष्मी सरगर अध्यक्षस्थानी होत्या. कुपवाड येथील नगररचना विभागातील गुंठेवारी नियमितीकरणाच्या महत्त्वाच्या शासकीय फायली गहाळ झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून विभागीय चौकशी करण्याची मागणी नगरसेवक प्रकाश मुळके यांनी केली. फायली गहाळ होणे हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून हेतुपुरस्सर कृत्य अथवा संगनमताची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अभिलेख व्यवस्थापन, डिजिटल नोंदी आणि सुरक्षित साठवणुकीची प्रभावी यंत्रणा उभारावी तसेच चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, वानलेसवाडी येथील गुंठेवारी सर्व्हे क्रमांक ४५ मधील दोन ओपन स्पेस (प्रत्येकी सुमारे सहा गुंठे) जागांची गुंठेवारी प्रमाणपत्र काढून विक्री झाल्याचा आरोपही मुळके यांनी केला. महापालिकेच्या पॅनेलवरील विधिज्ञांचा सविस्तर अभिप्राय घेऊन प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुळके यांनी केली. सांगली-मिरज रोडनजिक लेप्रसी रुग्णालयासमोर हेमकिरणच्या मागील बाजूच्या ८० गुंठे जागेवरील बेकायदा गुंठेवारीप्रकरणी सुनावणी घेण्याचे निर्देश आयुक्तांनी नगररचना विभागाला दिले आहेत. याप्रकरणी चौकशी, सुनावणी काहीच झाले नसल्यावरून नगरसेवक संतोष पाटील यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोट्यवधी रुपयांच्या महापालिकेच्या या जागेबाबत तातडीने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.