भाईंदर : मिरा रोड येथील एका बारमध्ये मद्यप्राशनानंतर बिल भरण्यावरून झालेल्या वादातून एका अभिनेत्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी बार व्यवस्थापक आणि दोन वेटर अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नियामद अन्वर खान (४१) असे जखमी अभिनेत्याचे नाव आहे. खान हे त्यांच्या दोन मित्रांसह मिरा रोड येथील अक्वा ढाबा बारमध्ये मद्यप्राशनासाठी गेले होते. खाणे-पिणे झाल्यानंतर खान यांचे दोन्ही मित्र त्यांना न सांगता बारमधून निघून गेले. त्यानंतर बार कर्मचाऱ्यांनी खान यांना तीन हजार रुपयांचे बिल दिले.बिल भरण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर बार व्यवस्थापक किशोर अण्णा आणि दोन वेटर यांनी खान यांना बारच्या पार्किंग परिसरात नेले. तेथे लाठी-काठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप खान यांनी तक्रारीत केला आहे.या मारहाणीत खान यांच्या शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर भाईंदर पश्चिम येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या प्रकरणी काशिमिरा पोलिसांनी बार व्यवस्थापक किशोर अण्णा आणि दोन वेटर यांच्याविरोधात धोकादायक हत्याराने दुखापत करणे तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.