सांगली शहरातील कृष्णा नदी पात्रात आज मंगळवारी सकाळी एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना घडली आहे. दररोज सकाळी नदीत पोहण्यासाठी जाणाऱ्या ग्रुपमधील श्री. जालिंदर साळुंखे (उर्फ नाना, वय ६०) यांच्यावर मगरीने थेट जीवघेणा हल्ला चढवला. या रक्तरंजित हल्ल्यामुळे संपूर्ण सांगली शहरात आणि नदीकाठच्या परिसरात तीव्र भीतीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घनश्याम नगर येथे राहणारे जालिंदर साळुंखे हे नेहमीप्रमाणे आज सकाळी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत कृष्णा नदीत पोहण्यासाठी उतरले होते. ते पाण्यात पोहत असताना अचानक दबा धरून बसलेल्या महाकाय मगरीने त्यांच्यावर झडप घातली. मगरीने थेट त्यांच्यावर हल्ला चढवल्याने साळुंखे गंभीर जखमी झाले.
सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव!
मगरीने हल्ला करताच नदीपात्रात एकच खळबळ उडाली. मात्र, सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत मगरीच्या तावडीतून साळुंखे यांना सोडवले आणि तातडीने नदीबाहेर काढले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. जखमी साळुंखे यांना तात्काळ शासकीय सिव्हिल रुग्णालय, सांगली येथे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
नागरिकांचा संताप: प्रशासन झोपले आहे का?
कृष्णा नदीत मगरींचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यापूर्वीही अनेकदा मगरींचे दर्शन झाले आहे, मात्र वन विभाग आणि स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. आज थेट एका ज्येष्ठ नागरिकावर हल्ला झाल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. "प्रशासन एखाद्याचा बळी जाण्याची वाट पाहत आहे का?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. वन विभागाने तात्काळ या मगरीचा बंदोबस्त करावा आणि नदीकाठी कडक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी तीव्र मागणी आता सांगलीकरांमधून होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.