सांगलीत भाजपातर्फे भव्य रक्तदान शिबिरे; स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
सांगली :-भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सांगली विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त हे स्तुत्य उपक्रम राबवण्यात आले.
आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि भाजपा सांगली शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली सिव्हील हॉस्पिटलसह कुपवाड पूर्व मंडल, उत्तर मंडल, मध्य मंडल, ग्रामीण मंडल आणि पश्चिम मंडल येथे मंडल अध्यक्षांच्या नेतृत्वात ही शिबिरे पार पडली. या शिबिरांना भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
'सेवा आणि समर्पण' विचारांची प्रत्यक्ष कृती
भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून समाजाच्या सुख-दुःखात धावून जाणारा आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष आहे, हे या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून पक्षाच्या 'सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी' या विचारांना प्रत्यक्ष कृतीची जोड देण्यात आली.
स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली
या प्रसंगी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याशिवाय, स्टेशन चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमातही आमदार गाडगीळ यांनी उपस्थित राहून स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले.
रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान
रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाऱ्या सर्व रक्तदात्यांना आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
"रक्तदान हे गरजू रुग्णांना जीवनदान देणारे अत्यंत पवित्र कार्य आहे. प्रत्येक निरोगी नागरिकाने आपली सामाजिक जबाबदारी ओळखून रक्तदानासाठी स्वयंस्फूर्तीने पुढे आले पाहिजे."
— आमदार सुधीरदादा गाडगीळ व जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग
आयोजकांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय कर्मचारी आणि रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, पुणे शहर जिल्हा प्रभारी शेखर इनामदार, मनपा सभापती अतुल माने, नगरसेवक विश्वजित पाटील, उदय बेलवलकर, संतोष पाटील, केदार खाडिलकर, सुरेश बंडगर, युवराज गायकवाड, दीपक वायदंडे यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.