मुंबई : शिवसेनेचे आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे. रमेश म्हात्रे यांना कल्याणमधील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंजूर केलेल्या जामिनाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. आज प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने विशेष सुनावणी घेऊन हा अंतरिम आदेश दिला. कल्याणमधील कोर्टाने दिलेल्या जामीन आदेशाविषयी मुंबई हायकोर्टाने सुमोटो दखल घेऊन या प्रकरणावर विशेष सुनावणी घेतली.
डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात ड्युटीवर असलेल्या एक महिला डॉक्टर आणि दोन पुरुष डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी मारहाण केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. यावरून रमेश म्हात्रे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेवर टीका झाली होती. विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अक्षय कारंडे, रमेश पवार आणि प्रमोद उर्फ प्रकाश निकम या तीन आरोपींना अटक केली होती.
मुख्य आरोपी असलेले रमेश म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने दबाव वाढल्यानंतर म्हात्रे यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. त्यानंतर न्यायाधीश श्रीमती के. एस. कातकडे यांनी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्याऐवजी वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. या संपूर्ण प्रकरणाची प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी स्वप्रेरणेने दाखल करून घेतलेल्या याचिकेमार्फत दखल घेऊन आज, शनिवारी सुनावणी घेतली.
हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना शरण जाण्याचा आदेश
१४ जुलै रोजी कल्याणमधील कोर्टाने दिलेला जामीन आदेश हायकोर्टाने स्थगिती करून रमेश म्हात्रे यांना पोलिसांना शरण जाण्याचा आदेश दिला आहे. तसेच ते शरण आले नाही तर त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्याचे कठोर निर्देशही हायकोर्टाने दिले आहेत.
हायकोर्टाचं डॉक्टरांना संपावर न जाण्याचं आवाहन
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेने या प्रकरणावरून सोमवारी राज्यातील आरोग्य सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. खंडपीठाने त्याचीही दखल घेत, डॉक्टरांनी संपावर जाऊ नये, असे आवाहनही केले आहे.
खंडपीठाने नेमकं काय म्हटलं आहे?
नगरसेवक रमेश म्हात्रे यांना हायकोर्टाने पोलिसांसमोर शरण जाण्यासाठी उद्या, रविवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. तोपर्यंत शरणागती पत्कारली नाही, तर त्यांच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले आहे. तसेच म्हात्रे यांच्याविरोधात यापूर्वी १८ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते, याचीही नोंद खंडपीठाने घेतली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.