अकोल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगाव येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल जवळपास 3 कोटींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. जळगावातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी एसीबी कारवाई मानली जात आहे. 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर एसीबीच्या पथकाने चौधरी यांच्या घराची झाडाझडती घेतली असता बेहिशेबी संपत्तीचा मोठा साठा समोर आला.
नाशिक आणि जळगाव एसीबीच्या 8 ते 10 अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री 'इन-कॅमेरा' कारवाई करत घराची तपासणी केली. या कारवाईत तब्बल 1 कोटी 53 लाखांहून अधिक रोख रक्कम, 72 लाखांच्या आसपास सोन्या-चांदीचे दागिने, तसेच विविध ठिकाणच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने ती मोजताना यंत्रणेचीही दमछाक झाली.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात 422 ग्रॅमपेक्षा अधिक सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, लाखो रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या, महागड्या घरगुती वस्तू आणि आरोपी तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावरील मालमत्तेची कागदपत्रे यांचा समावेश आहे. या सर्वांची एकूण किंमत 2 कोटी 94 लाख 64 हजार 847 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. किरण चौधरी यांच्याविरोधात अकोला येथील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.