धावत्या बस मधून थुंकण्यासाठी मान बाहेर काढली अन...; गुटख्याच्या व्यसनाने घेतला अंगावर काटा आणणारा बळी!
धारवाड : बस वा अन्य वाहनातून प्रवास करताना खिडकीतून शरीराचे अवयव बाहेर काढणे किती धोकादायक आहे, याचा प्रत्यय हुबळीत बुधवारी आला. गुटखा थुंकण्यासाठी धावत्या बसच्या खिडकीतून डोकावणाऱ्या एका विद्यार्थ्याचे शीर मागून येणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत धडावेगळे झाले. कुंदगोळच्या (जि. धारवाड) शहराबाहेर बुधवारी दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. पक्कीरेश (वय १७, रा. शिरुर, ता. कुंदगोळ) असे त्याचे नाव आहे.
पक्कीरेश हुबळीतील एका आयटीआयचा विद्यार्थी होता. कॉलेज संपल्यानंतर हुबळीहून त्याच्या शिरुर या गावी जाण्यासाठी तो परिवहन महामंडळाच्या हुबळी ते लक्ष्मेश्वरम बसमध्ये चढला. तो बसच्या मागच्या सीटवर बसला होता. बस कुंदगोळ शहराबाहेरुन जात असताना गुटखा थुंकण्यासाठी त्याने खिडकीतून आपले डोके बाहेर काढले. त्याचवेळी बसच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका टिप्परने पक्कीरेशच्या डोक्याला जोरदार धडक दिली. त्यामुळे, त्याचे डोके शरीरापासून वेगळे होऊन रस्त्यावर पडले. तर धड बसच्या खिडकीजवळ लटकलेल्या अवस्थेत होते. हे दृश्य पाहून बसमधील प्रवासी व इतरांचा थरकाप उडाला. अपघाताची माहिती मिळताच कुंदगोळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी स्थानिक रुग्णालयात पाठविला. टिप्पर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तपास करत आहेत.
खिडकीतून डोकावणे धोकादायक
बस वा इतर वाहनांतून प्रवास करताना खिडकीतून हात किंवा डोके बाहेर काढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे. विशेषतः तरुण आणि विद्यार्थ्यांनी प्रवास करताना सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, हे या घटनेने दाखवून दिले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.