Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भयंकर आवाज अन् घरे हालली! मध्यरात्री गाढ झोपेत असताना मराठवाडा हादरला; पाहा कुठं होतं भूकंपाचं केंद्रबिंदू

भयंकर आवाज अन् घरे हालली! मध्यरात्री गाढ झोपेत असताना मराठवाडा हादरला; पाहा कुठं होतं भूकंपाचं केंद्रबिंदू


हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यासह संपूर्ण परिसर मध्यरात्री भूकंपाच्या जोरदार धक्क्याने हादरला आहे. बुधवारी, मध्यरात्री १ वाजून २० मिनिटांनी हा भूकंप झाला असून, राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (NCS) मापकावर याची ३.६ रिश्टर स्केल इतकी तीव्रतेची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली ५ किलोमीटर खोलीवर, औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा आणि जलालदाभा परिसरात होता. भूगर्भातून झालेल्या भीषण आवाजामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, अनेकांनी सुरक्षित स्थळी धाव घेत संपूर्ण रात्र जागून काढली.
घरांची तावदाने अन् भांडी हालली...

मध्यरात्री १:२० च्या सुमारास अचानक भूगर्भातून मोठा गडगडाट झाला आणि काही सेकंदांतच जमिनीला तीव्र हादरे बसले. या धक्क्यांमुळे गावकऱ्यांच्या घरांची तावदाने (खिडक्यांच्या काचा) आणि घरातील भांडी कपाटातून खाली पडून हलू लागली. भूकंप होत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी लहान मुलांना घेऊन घराबाहेर धाव घेतली आणि उघड्या मैदानात आसरा घेतला. सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

'या' गावांना बसले भूकंपाचे तीव्र धक्के
या भूकंपाची व्याप्ती मोठी होती. याचा केंद्रबिंदू फुलदाभा-जलालदाभा असला, तरी आजूबाजूच्या अनेक गावांना याचे तीव्र धक्के जाणवले. औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा, जलालदाभा, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, निशाणा, असोंदा, काकडदाभा, पांगरा, मेथा, जडगाव, राजापूर, जांब या गावात धक्के जाणवले. तर, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, कुपटी, वापटी, कुरुंदा, गिरगाव या गावातही जमीन हादरल्याचे वृत्त आहे.
प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक संतप्त...

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा हा परिसर गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या भागात सातत्याने भूगर्भातून आवाज येणे आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के बसणे सुरूच आहे. असे असतानाही प्रशासन भूकंपाचे नेमके शास्त्रीय कारण शोधण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिक संतप्त...
वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे आणि कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा हा परिसर गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे केंद्रबिंदू ठरत आहे. या भागात सातत्याने भूगर्भातून आवाज येणे आणि सौम्य ते मध्यम स्वरूपाचे धक्के बसणे सुरूच आहे. असे असतानाही प्रशासन भूकंपाचे नेमके शास्त्रीय कारण शोधण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

भूकंप झाल्यानंतर महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी केवळ गावांना भेटी देण्याचे सोपस्कार पूर्ण करतात. 'काय करावे आणि काय करू नये' याच्या जनजागृतीच्या सूचना दिल्या जातात, पण वारंवार होणाऱ्या या भूकंपांमागील मूळ कारण काय? आणि भूकंपाची तीव्रता दिवसेंदिवस का वाढत आहे? याचा ठोस शोध का घेतला जात नाही, असा संतप्त सवाल आता फुलदाभा आणि परिसरातील गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.