कडेगाव (सांगली) : भारती विद्यापीठासह विविध संस्थात्मक कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नेहमीच संवादी राहणाऱ्या आमदार विश्वजित कदम यांनी काल मुंबई ते पुणे असा सहप्रवास केला. आमदार कदम काल मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे कामानिमित्त गेले होते. भेटीनंतर ते पुण्याकडे निघणार होते. त्याचवेळी मुख्यमंत्रीही आषाढी वारी दर्शनासाठी पुण्यास येणार होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोबतच येण्यास सांगितल्यानंतर हा योग जुळून आला. या सहज भेटीची राजकीय वर्तुळात मात्र चर्चा रंगली.
गेले काही दिवस कोण कोणत्या पक्षात जाणार याच्याच ब्रेकिंग (?) न्यूज सुरू असताना श्री. कदम यांची भाजपसोबतच जवळीकही नेहमी चर्चेत येत असते. कोण कोणाच्या गळाला लागणार, याबाबत नेहमीच आवई उठतात. काही काळाने त्या विरतात. काल मुख्यमंत्री पुणे मुक्कामी असलेल्या ज्ञानोबा-तुकोबांच्या पालखी दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांनी विश्वजित यांना सोबत गाडीत बसण्यास सांगितले. त्यावेळी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. उभय नेत्यांनी मुंबई ते पुणे असा एकत्र प्रवास केला. याआधीही फडणवीस यांनी भारती विद्यापीठाच्या समारंभास उपस्थिती लावली असता त्यावेळी माध्यमांमध्ये खूपच चर्चा रंगल्या होत्या. आता पुढील काही दिवस या प्रवासाची चर्चा सुरू राहील. कारण सध्या या चर्चेला 'ऑपरेशन टायगर', 'ऑपरेशन लोटस'ची फोडणी आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.