कोलकाता येथे शुक्रवारी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अभिनेत्री श्रीलेखा मित्रा कायदेशीर अडचणीत सापडली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणारे पोस्टर दाखवल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
भाजप नेत्या केया घोष यांनी आनंदपूर पोलीस ठाण्यात श्रीलेखा मित्रा हिच्याविरुद्ध तक्रार नोंदवली. मिळालेल्या माहितीनुसार, बिधाननगर सायबर क्राईम पोलीस ठाण्यासह विविध जिल्ह्यांमध्येही तिच्याविरुद्ध अतिरिक्त तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
भाजप नेत्या केया घोष यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, 24 जुलै रोजी सियालदह ते धर्मतळा दरम्यान काढण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्च्यात श्रीलेखा मित्रा हिने सुद्धा सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्यांनी पंतप्रधान मोदींचे "आक्षेपार्ह व अपमानजनक" व्यंगचित्र असलेले पोस्टर तिने तिथे जाहिररित्या झळकवले.
श्रीलेखा मित्राच्या विरोधात तक्रार
तक्रारीत म्हटले आहे की, "जरी भारताच्या संविधानातील कलम 19(1)(ब) अन्वये शांततापूर्ण निदर्शने करण्याचा अधिकार मिळाला असला, तरी हा अधिकार वाजवी निर्बंधांच्या अधीन आहे. राजकीय निदर्शनांच्या माध्यमातून असहमती दर्शवताना सार्वजनिक बदनामी करणे, सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान करणे किंवा जनमाणसास भडकवणारे अपमानजनक चित्रण करणे, या गोष्टींचा त्यात समावेश होऊ शकत नाही."
तक्रार दाखल, पण FIR अद्याप नाही
पोलिसांनी तक्रारी नोंदवली असली तरी, अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले. या वादावर भाष्य करताना श्रीलेखा मित्रा हिने आपली भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की, पंतप्रधान मोदींचा अपमान करण्याचा तिचा कोणताही हेतू नव्हता.
मी देशविरोधी नाही - श्रीलेखा मित्रा
मित्रा म्हणाली, "माझा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये मी एक विशिष्ट पोस्टर धरलेले दिसत आहे. मी कदाचित भाजप-विरोधी असेन, पण मला 'देशविरोधी' म्हणणे हास्यास्पद आहे. मी मुद्दाम त्या पोस्टरसोबत पोज दिली, हा विचारही तितकाच हास्यास्पद आहे."
मी चष्मा घातला नव्हता
तिने स्पष्ट केले की, ती विद्यार्थ्यांच्या एका आंदोलनात सहभागी होण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होती आणि जमावासोबत धावत असतानाच कोणीतरी तिच्या हातात ते पोस्टर दिले. त्या वेळी तिने वाचण्यासाठी वापरला जाणारा चष्मा (घातलेला नसल्यामुळे, तिला त्यावरील चित्र स्पष्टपणे दिसले नाही. श्रीलेखा मित्रा म्हणाली, "मी माझा चष्मा आणायला विसरले होते आणि माझ्याकडे फक्त गॉगल होता." त्या वेळी पोलीस लाठीचार्ज करत होते, त्यामुळे पोस्टरवर छापलेले चित्र नीट न पाहताच तिने घाईघाईने ती पोज दिली.
अभिनेत्रीला अटक करण्याची मागणी
स्पष्टीकरण देऊनही, भाजप नेत्या घोष यांनी या अभिनेत्रीविरुद्ध अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. पंतप्रधानांचे केवळ पक्षाचे नेते म्हणून नव्हे, तर देशाचा नागरिक म्हणून ज्या प्रकारे चित्रण करण्यात आले, त्याबद्दल केया घोष यांनी संताप व्यक्त केला. घोष यांनी मागणी केली की, "अशी आक्षेपार्ह प्रतिमा शेअर केल्याबद्दल श्रीलेखा यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या कृत्यासाठी त्या कठोर शिक्षेस पात्र आहेत आणि त्यांना त्वरित अटक केली पाहिजे. अन्यथा, आम्ही न्यायालयात दाद मागू." श्रीलेखा मित्रा तिच्या परखड मतांसाठी ओळखली जाते. टॉलीवूडमधील घराणेशाही, पक्षपातीपणा आणि राजकीय हस्तक्षेप यांविरुद्ध तिने अनेकदा आवाज उठवला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.