आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलीस कर्मचाऱ्याने एके-47 ने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील सिवान जिल्ह्यात 25 जुलै रोजी झालेल्या 'बिहार बंद' आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलीस कर्मचाऱ्याने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवताना एके-47 रायफलचा वापर केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं. या राज्यव्यापी बंददरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संघटनांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शनं केली. यादरम्यान अनेक ठिकाणी आंदोलक व पोलीस यांच्यात चकमकी झाल्याच्या घटना घडल्या.
अधिकृत माहितीनुसार, बिहार पोलीस मुख्यालयाने पोलीस कॉन्स्टेबल आंदोलनादरम्यान एके-47 वापरत असल्याच्या व्हिडीओची गंभीर दखल घेतली आहे. यानंतर संबंधित पोलीस कॉन्स्टेबलचं निलंबन करण्यात आलं आहे.
पाटण्यातील जयप्रभा मेदान्ता रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन जखमी आंदोलकांची प्रकृती स्थिर असल्याचं समजत आहे जखमींमध्ये 15 वर्षीय मोहम्मद आरिफचाही समावेश आहे. त्याच्या कुटुंबाने सांगितल्यानुसार, तो एका स्थानिक दुकानात काम करतो. नातेवाईकांनी सांगितलं की, 'बंद' सुरु असताना दुकान बंद करून तो घरी परतत होता. यावेळी उडालेल्या गोंधळादरम्यान त्याच्या मानेत गोळी लागली. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ती गोळी यशस्वीरीत्या बाहेर काढली असून, आता त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी एक्स अकाऊंटवर पोलिसांच्या कारवाईचा व्हिडीओ शेअर केली आहे. या व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी विद्यार्थ्यांवर गोळीबार करताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांनी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आणि सर्वत्र एकच प्रकारची पद्धत दिसून येत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध 'पेलेट गन्स'चा आणि बिहारमध्ये 'एके-47' (AK-47) रायफल्सचा वापर केल्याकडे लक्ष वेधलं.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलीस दलाची प्राथमिक जबाबदारी आहे आणि विहित कार्यपद्धतींचे उल्लंघन झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाते. त्यांनी पुढे सांगितले की, याप्रकरणी सविस्तर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीच्या निष्कर्षांवरून पुढील कारवाई निश्चित केली जाईल. बंदुकीचा वापर पोलीस नियमावलीनुसार केला गेला होता का? आणि त्याबाबत पुढील शिस्तविषयक किंवा कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे का? हे या चौकशीतून स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.
राज्यव्यापी बंदचा भाग म्हणून शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा झाले होते आणि त्यांनी गांधी मैदानाकडे कूच केले. विद्यार्थी घोषणा देत असतानाच, निदर्शक आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे परिस्थिती बिघडली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.