मुंबई : जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या बेकायदा औषध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून २०२६मध्ये राज्यभर विशेष मोहीम राबवत ३४ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत ४.१२ कोटी किमतीची बेकायदा औषधे, सौंदर्यप्रसाधने आणि वैद्यकीय साहित्यावर नियामक कारवाई करण्यात आली.
तसेच नऊ गुन्हे दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, विनापरवाना औषध व सौंदर्यप्रसाधनांची उत्पादन विक्री करणाऱ्या १५ ठिकाणी कारवाई करून २.३२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिशाभूल करणाऱ्या औषधांच्या जाहिरातींप्रकरणी ८ ठिकाणी कारवाई करून २.२७लाखांची औषधे जप्त करण्यात आली. तर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधनांवरील तीन धाडीत ३३.२६ लाखांचा साठा तसेच वैद्यकीय उपकरण नियमाअंतर्गत १.२६ कोटी किमतीच्या साहित्यावर प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले.
जूनमध्ये एफडीएने ७८७ औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे नमुने तपासले. त्यापैकी ७५२ नमुने प्रमाणित तर ३५ नमुने निकृष्ट आढळले. निकृष्ट ठरलेल्या सर्व बॅचची विक्री व वितरण तातडीने घांबवून बाजारातून 'रिकॉल' करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित उत्पादक, वितरक आणि परवानाधारकांविरोधात औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. निकृष्ट ठरलेल्या उत्पादनांमध्ये सनस्क्रीन लोशन, कुमकुम, आयुर्वेदिक औषधे, पॅरासिटामोल, अँटिबायोटिक्स, अॅस्पिरिन, कफ सिरप, शॅम्पू, मेकअप फिक्सर स्प्रे अशा विविध उत्पादनांचा समावेश आहे.
आयुक्तांचे आवाहन
अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे, की संशयास्पद औषधे, वैद्यकीय उपकरणे किंवा बेकायदा विक्रीची माहिती तातडीने 'एफडीए'च्या टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर द्यावी. जनतेच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरोधात अशाच धडक कारवाया पुढेही सुरू राहतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.