मुंबई: कोकणातून मुंबईकडे किंवा मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कोकण आणि रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) अक्षरशः ठप्प झाला आहे.
महामार्गावरील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तसेच काही भागात दरड कोसळल्याने गेल्या 30 तासांहून अधिक काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हजारो वाहने महामार्गावर अडकून पडली असून प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरातील सुकळी घाटासह अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर तीन फूटांपर्यंत पाणी साचल्यामुळे प्रशासनाला दोन्ही बाजूंची वाहतूक बंद ठेवावी लागली. त्यामुळे मुंबई-गोवा मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून अत्यावश्यक सेवांनाही मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, सततच्या पावसामुळे रायगडमधील अनेक नद्या धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचल्या आहेत. काही भागात दरडी कोसळण्याच्या घटनाही घडल्या असून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन पथके परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
हवामान विभागाने रायगड, मुंबई, ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 24 ते 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जोरदार पाऊस, पूरसदृश परिस्थिती, दरडी कोसळण्याचा धोका आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाल्यामुळे कोकणातील मालवाहतूक, एसटी बससेवा आणि खासगी वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. अनेक प्रवासी रात्रभर वाहनांमध्येच अडकून राहिल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून पाणी ओसरल्यानंतर आणि रस्ता सुरक्षित झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
प्रशासनाने कोकणात प्रवास करणाऱ्या नागरिकांना प्रवासापूर्वी वाहतुकीची ताजी माहिती घेण्याचे, पर्यायी मार्गांचा विचार करण्याचे आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.