Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पारले-जीमधील 'G'चा खरा अर्थ माहितीये का? 5 रुपयांच्या बिस्किटाचा 9,500 कोटींचा डाव; 97 वर्षांनंतर बाजारात करणार 'धमाका'

पारले-जीमधील 'G'चा खरा अर्थ माहितीये का? 5 रुपयांच्या बिस्किटाचा 9,500 कोटींचा डाव; 97 वर्षांनंतर बाजारात करणार 'धमाका'


मुंबई : सकाळच्या गरमागरम चहासोबत खाल्ले जाणारे 5 रुपयांचे पारले-जी बिस्किट हे केवळ एक खाद्यपदार्थ नसून अनेक भारतीयांच्या बालपणाशी जोडलेली एक खास आठवण आहे. आता हेच पारले-जी तयार करणारी कंपनी लवकरच शेअर बाजारातही पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.

सुमारे 97 वर्षांपूर्वी मुंबईतील विले पार्ले येथे केवळ 12 जणांसह सुरू झालेली पारले प्रॉडक्ट्स पुढील वर्षी प्रारंभिक समभाग विक्री (IPO) आणण्याची तयारी करत आहे. या आयपीओद्वारे कंपनी सुमारे 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 9,530 कोटी रुपये) उभारण्याचे लक्ष्य ठेवत आहे. आयपीओ आल्यानंतर त्यामध्ये गुंतवणूक करायची की नाही, याचा विचार नंतर करता येईल. मात्र अनेक वर्षांपासून घराघरात पोहोचलेल्या पारले-जी बिस्किटातील 'G'चा खरा अर्थ काय आहे, हे अनेकांना माहिती नाही.

'पारले ग्लुको'वरून झाले 'पारले-जी'
सुरुवातीला या बिस्किटाचे नाव 'पारले ग्लुको' (Parle Gluco) असे होते. 1960 च्या दशकात बाजारात अनेक कंपन्यांनी ग्लुकोज बिस्किटे याच्यासारख्या नावांनी विक्रीस आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होऊ लागला. यावर उपाय म्हणून 1982 मध्ये कंपनीने मोठे री-ब्रँडिंग केले. 'पारले ग्लुको' हे नाव छोटं करून 'पारले-जी' असे करण्यात आले.
'G'चा खरा अर्थ काय?

पारले-जीमधील 'G'चा मूळ अर्थ 'ग्लुकोज' (Glucose) असा होता. मात्र पुढे कंपनीने आपल्या प्रभावी मार्केटिंग मोहिमेद्वारे त्याचा अर्थ 'G for Genius' असा लोकप्रिय केला. विशेषतः लहान मुलांमध्ये ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर रुजवण्यात कंपनीला यश आले.

याच काळात बिस्किटाच्या पॅकिंगमध्येही बदल करण्यात आला. पूर्वी वापरले जाणारे पिवळ्या रंगाचे वॅक्स पेपर पॅकिंग बंद करून आज वापरला जाणारा प्लास्टिक रॅपर सुरू करण्यात आला. तसेच आज सर्वांना परिचित असलेला छोट्या मुलीचा फोटोही याच काळात पॅकेटवर छापण्यात आला.

97 वर्षांपूर्वी झाली सुरुवात
1929 मध्ये मोहनलाल दयाल यांनी मुंबईतील विले पार्ले येथे 'हाऊस ऑफ पारले' या नावाने कँडी तयार करण्याच्या व्यवसायाची सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी केवळ 12 जणांना कामावर ठेवले होते आणि हे सर्व त्यांच्या कुटुंबातील सदस्य होते.

कारखाना सुरू झाल्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे 1939 मध्ये कंपनीने बिस्किट उत्पादन सुरू केले. त्या काळात भारतात बहुतांश बिस्किटे परदेशातून आयात केली जात होती आणि त्यांची किंमत खूपच जास्त होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना ती खरेदी करणे परवडत नव्हते.

हे लक्षात घेऊन मोहनलाल दयाल यांनी सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणारे पारले ग्लुको बिस्किट बाजारात आणले. अल्पावधीतच या बिस्किटाला मोठी लोकप्रियता मिळाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश-भारतीय सैन्यातही या बिस्किटाची मोठ्या प्रमाणावर मागणी होती.
उत्पादन पूर्णपणे बंद करण्याची वेळ

पारले-जीच्या इतिहासात एक काळ असा आला की कंपनीवर मोठे संकट ओढवले. 1947 मध्ये देशाच्या फाळणीनंतर भारतात गव्हाची मोठी टंचाई निर्माण झाली. गहू हा या बिस्किटाचा मुख्य कच्चा माल असल्याने कंपनीला पारले ग्लुको बिस्किटाचे उत्पादन काही काळासाठी पूर्णपणे बंद करावे लागले. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी कंपनीने गव्हाऐवजी बार्ली (जव) वापरून बिस्किटे तयार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे उत्पादन सुरू ठेवणे शक्य झाले.

आज 21 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय
आज पारले प्रॉडक्ट्सचा व्यवसाय भारतापुरता मर्यादित राहिलेला नाही. कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री 21 हून अधिक देशांमध्ये करते. भारतभर कंपनीच्या 125 हून अधिक उत्पादन युनिट्स आहेत. पारले प्रॉडक्ट्स केवळ पारले-जीपुरती मर्यादित नाही. कंपनी बिस्किटांसोबतच चॉकलेट, टॉफी, केक, रस्क, स्नॅक्स आणि पीठ यांसारखी अनेक उत्पादनेही तयार करते.

पारले-जी व्यतिरिक्त हाइड अँड सीक, क्रॅकजॅक, मोनॅको, किस्मी, मेलोडी आणि मँगो बाईट यांसारखे अनेक लोकप्रिय आणि प्रतिष्ठित ब्रँड्सही पारले प्रॉडक्ट्सच्या मालकीचे आहेत. आता जवळपास शतकभराचा प्रवास पूर्ण करणारी पारले प्रॉडक्ट्स कंपनी शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत असून, तिच्या प्रस्तावित आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.