🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

LPG सिलेंडर हद्दपार होणार? आता स्वयंपाकघरात येणार 'इथेनॉल' गॅस; काय आहे सरकारचा प्लॅन?

LPG सिलेंडर हद्दपार होणार? आता स्वयंपाकघरात येणार 'इथेनॉल' गॅस; काय आहे सरकारचा प्लॅन?


पेट्रोलमध्ये इथेनॉलचे यशस्वी मिश्रण केल्यानंतर सरकारने आपला मोर्चा आता स्वयंपाकघराकडे वळवला आहे. देशातील घरगुती एलपीजी सिलेंडवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार एका अत्यंत महत्त्वाकांक्षी धोरणावर काम करत आहे. स्वयंपाकासाठी ‘इथेनॉल’ हे इंधन आणण्यासाठी सरकार तयारी करत असून सप्टेंबर २०२६ पर्यंत हे धोरण जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या घरातील एलपीजीची जागा भविष्यात इथेनॉल घेऊ शकते.

नेमका काय आहे सरकारचा प्लॅन?

‘द इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सध्या भारतात ‘इथेनॉल’चा वापर पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी केला जातो. मात्र, आता हे हरित इंधन थेट स्वयंपाकघरात पोहोचवण्याची तयारी सुरू आहे. इथेनॉलवर आधारित स्वयंपाकाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार दोन योजना राबवू शकते. यामध्ये एकरकमी अनुदान (स्टोव्ह खरेदीसाठी एकरकमी मदत) दिले जाऊ शकते किंवा एलपीजीप्रमाणेच थेट गॅसवर सबसिडी दिली जाऊ शकते.

सरकारच्या सूचनेनुसार, तेल विपणन कंपन्या सध्या इथेनॉलवर चालणाऱ्या विशेष शेगड्यांची संशोधन आणि विकास पातळीवर चाचणी घेत आहेत. यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचे अधिग्रहण किंवा भागीदारी करण्याचीही तयारी सुरू आहे.

पेट्रोल पंपांवर उभारले जाणार ‘इथेनॉल एटीएम’
या धोरणाची वेगवान अंमलबजावणी करण्यासाठी उपलब्ध पुरवठा साखळीचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना त्यांच्या पेट्रोल पंपांवर आणि रिटेल आउटलेट्सवर ‘इथेनॉल एटीएम’ सुरू करण्यास सांगितले जाऊ शकते. या एटीएममधून ग्राहक त्यांच्या गरजेनुसार इथेनॉलच्या सिलेंडर विकत घेऊ शकतील, जे थेट स्वयंपाकाच्या स्टोव्हला जोडता येईल. यामुळे वितरणाचा मोठा खर्च वाचणार आहे.
भारताकडे ‘इथेनॉल’चा अतिरिक्त साठा

भारताकडे सध्या तब्बल ७ अब्ज लीटर अतिरिक्त इथेनॉल क्षमता उपलब्ध आहे. या साठ्याचा योग्य वापर करण्यासाठी घरगुती बाजारपेठेसोबतच निर्यातीचाही विचार सुरू आहे. नेपाळ, बांगलादेश आणि इंडोनेशिया यांसारख्या शेजारील देशांनी त्यांच्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात कच्चा माल आणि डिस्टिलिंग क्षमता नाही. अशा परिस्थितीत भारत या देशांना इथेनॉलची निर्यात करून मोठी परकीय गंगाजळी कमवू शकतो.

इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरुन गोंधळ
स्वयंपाकासाठी इथेनॉल इंधन वापरण्याचे सरकारचे ध्येय असले तरी सध्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवरुन गोंधळाचे वातावरण आहे. अनेक वाहनधारक इथेनॉल मिश्रित इंधनामुळे गाडीत बिघाड किंवा मायलेज कमी झाल्याच्या तक्रारी करत आहेत. काहींनी तर यावरुन ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात इथेनॉल पर्याय आणण्यापूर्वी सरकारला लोकांच्या या शंकांचे निरसन करावे लागणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.