🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

​"कमिशन दिलं की काम करता का?" चिमुकल्याच्या एकाच प्रश्नाने खाकी वर्दीची पळता भुई थोडी; जिल्हाधिकाऱ्यांसमोरच पोलिसांची पिसे काढली!

​"कमिशन दिलं की काम करता का?" चिमुकल्याच्या एकाच प्रश्नाने खाकी वर्दीची पळता भुई थोडी; जिल्हाधिकाऱ्यांसमोरच पोलिसांची पिसे काढली!


जिल्हाधिकाऱ्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आयोजित केलेल्या जनता दरबारमध्ये एका १३ वर्षांच्या आठवीत शिकणाऱ्या चिमुकल्यानं विचारलेल्या प्रश्नांवर प्रशासनातील बडे अधिकारीही निरुत्तर झाले. सध्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आठवीत शिकणारा अमिताभ गुप्ता त्याची अडचण सांगण्यासाठी जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह यांच्याकडे गेला होता. त्यावेळी थेट जिल्हाधिकाऱ्यांना त्याने असे काही प्रश्न विचारले की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

उत्तर प्रदेशातल्या लखिमपूर खेरी जिल्ह्यातील सदर परिसरात राहणारा अमिताभ गुप्ता या चिमुकल्यानं जिल्हाधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणं मांडलं. वडिलांना मानसिक आजार आहे आणि आई इतरांची धुणीभांडी करून घरखर्च चालवते. वडिलांना वारशानं मिळालेल्या घराच्या एका भागात नातेवाईकांनी ताबा मिळवून कुलुप लावलं आहे. यामुळे कुटुंबाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. मात्र यावर अद्याप काही मार्ग निघालेला नाही असं चिमुकल्यानं सांगितलं.

खूपदा तक्रारी केल्या तरी काहीच कारवाई झाली नाही. अधिकाऱ्यांनी कुलुप काढावं अशी मागणी चिमुकल्यानं केली. जर घराचा भाग वापरायला मिळाला तर तो भाड्यानं देऊन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला थोडेफार पैसे मिळतील असं चिमुकल्यानं म्हटलं. एका पोलीस अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांसमोर आम्ही कुलूप काढून देऊ असं म्हटलं. त्यावर मुलाने काढून देऊ नाही, तर काढा असं म्हटलं. तसंच तुम्हाला फक्त कमीशन दिलं की काम होतं असा आरोपही केला. चिमुकल्याच्या या बोलण्यावर अधिकाऱ्यांना हसू आलं.

जिल्हाधिकाऱ्यांनी चिमुकल्याला इतक्या लहान वयात जास्त बोललं नाही पाहिजे, शिक्षणावर लक्ष द्यायला हवं असं सांगितलं. यावर चिमुकल्या अमिताभनं म्हटलं की, फक्त शिक्षणाचा सल्ला देऊन काम होत नाही, कारण घरची स्थिती खराब आहे. आई महिन्याला ३ हजार कमावते. एवढ्या पैशात कुटुंबाचा खर्च, पुस्तकं वह्या आणि शिक्षण कसं व्हायचं असा प्रश्नही विचारला. फक्त ३ हजारात काय व्हायचं साहेब असंही चिमुकला म्हणतो.

अमिताभनं आरोप केला की, पहिल्यांदा तक्रार केल्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईला नकार दिला होता. व्हायरल व्हिडीओनंतर पोलीस आणि प्रशासनाची टीम मुलाच्या घरी पोहोचली. त्यावेळी मुलाच्या आईनेसुद्धा प्रशासनासमोर घरची परिस्थिती सांगितली. जिल्ह्याधिकाऱ्यांसमोर बिनधास्तपणे आपली बाजू मांडणाऱ्या १३ वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.