धर्मेंद्र प्रधान हे जून २०२४ पासून देशाचे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थी राजकारणातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करून देशाचे ३० वे शिक्षण मंत्री बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास राहिला आहे. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर असलेले त्यांचे वैयक्तिक जीवन, कौटुंबिक पार्श्वभूमी, आवडीनिवडी आणि त्यांची शैक्षणिक पात्रता याविषयीची माहिती खालीलप्रमाणे आहे.
राजकीय कारकीर्द आणि विद्यार्थी चळवळ
धर्मेंद्र प्रधान यांचा राजकीय प्रवास १९८३ मध्ये ओडिशामधील तालचर महाविद्यालयात उच्च माध्यमिक विद्यार्थी असताना अभाविप (ABVP) चे कार्यकर्ते म्हणून सुरू झाला. १९८५ मध्ये ते तालचर महाविद्यालय विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बनले. १९९३ मध्ये त्यांची अभाविपच्या राज्य सचिवपदी, तर १९९५ मध्ये राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. १९९८ मध्ये त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
वैयक्तिक जीवन आणि कुटुंब
धर्मेंद्र प्रधान यांचा जन्म २६ जून १९६९ रोजी ओडिशामधील तालचर येथे झाला. ९ डिसेंबर १९९८ रोजी त्यांचा विवाह झाला असून, त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
छंद आणि आवडीनिवडी
डिजिटल संसदच्या संकेस्थळावरील माहितीनुसार, धर्मेंद्र प्रधान यांना तरुणांशी संवाद साधणे आणि त्यांना समाजकार्यासाठी प्रवृत्त करणे आवडते. सामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवणे, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर दुर्बल घटकांच्या गरिबीची आणि मागासलेपणाची कारणे शोधणे यात त्यांना रस आहे.
शिक्षण मंत्री स्वतः किती शिकलेले आहेत?
सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच पडणारा प्रश्न म्हणजे देशाच्या शिक्षण व्यवस्थेची धुरा सांभाळणारे शिक्षण मंत्री स्वतः किती शिकलेले आहेत? धर्मेंद्र प्रधान हे स्वतः उच्चशिक्षित आहेत. त्यांनी ओडिशातील नामांकित उत्कल विद्यापीठ, वाणी विहार येथून 'मास्टर ऑफ आर्ट्स' (मानववंशशास्त्र / Anthropology) ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. मानवी समाज, संस्कृती आणि त्याच्या विकासाचा सखोल अभ्यास असलेल्या या शिक्षणामुळेच त्यांना देशातील सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांची उत्तम जाण आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.