🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

NEET घोटाळ्याने कुटुंब उद्ध्वस्त! आंदोलनात पुतणी जखमी, पुतण्यावर उपचार; 'स्वाभिमानासाठी' भाजप नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी!"

"NEET घोटाळ्याने कुटुंब उद्ध्वस्त! आंदोलनात पुतणी जखमी, पुतण्यावर उपचार; 'स्वाभिमानासाठी' भाजप नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी!"


दिल्लीत नीट पेपरफुटी प्रकरणी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सीजेपीकडून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनात सोमवारी दिल्ली पोलिसांकडून बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.

तसंच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यात अनेक विद्यार्थी आंदोलक जखमी झालेत. दरम्यान, नीट पेपर फुटीमुळे पुतण्याच्या मानसिक आरोग्यवर परिणाम तर आंदोलनात पुतणी जखमी झाल्यानंतर भाजपच्या शहरप्रमुखानं राजीनामा दिल्याची पोस्ट व्हायरल होत आहे.अहिल्यानगरच्या राहुरीचे भाजप शहर प्रमुख गोविंद घोरपडे अशा नावाने पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालीय. नीट पेपर फुटीनंतर फेर परीक्षा पार पडली मात्र पेपर नीट देता न आल्यानं पुतण्याला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागत आहेत. याचा कुटुंबावरही परिणाम झाला असल्याचं पोस्टमध्ये म्हटलंय. दुसरीकडे अहिल्यानगरमधील स्थानिक भाजप नेत्यांनी असा कुणी पदाधिकारी नसल्याचं सांगितलं.

पोस्टमध्ये काय म्हटलंय?

गेल्या बारा वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना पक्षाचे अनेक आदेश डोळे झाकून पाळले. अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक सामाजिक कार्यक्रम पक्षाच्या बॅनरखाली घेतले. स्वतःच्या खिशातले पैसे खर्च केले. तिकीटाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी आतापर्यंत झोकून काम केल्याचंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणामुळे कुटुंबाचं मानसिक स्वास्थ्य ढासळल्याचं सांगताना गोविंद घोरपडे यांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलंय की, माझा पुतण्या सुदर्शन घोरपडे बारावीला होता. नीट पेपर फुटल्यानंतर त्याने खचून न जाता पुन्हा पेपर देण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी बहीण देवयानी घोरपडे दिल्लीत एमबीबीएस डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिचा आदर्श सुदर्शनसमोर होता. नीटची दुसऱ्यांदा घेतलेली परीक्षा सुदर्शनला नीट देता नाही. परीक्षा झाल्यानंतर मात्र तो एकटाएकटा राहू लागला. अर्थात त्याच्या आईवडिलांनी त्याला चांगलं सांभाळून घेतलं. पण पेपरफुटीचा त्याच्या मनावर परिणाम झाला. आता पुण्यातील चांगल्या मानसोपचारतज्ज्ञाकडून तो उपचार घेत आहे.

दिल्लीत झालेल्या आंदोलनात सुदर्शनची बहीण देवयानी उपस्थित होती. तिच्या दोन मैत्रिणींसोबत वैद्यकीय प्रथमोपचारपेटी सोबत घेऊन ती आंदोलनस्थळी गेली होती. पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर तिच्या डॉक्टर मैत्रिणीच्या खांद्यावर जबर मार बसला आहे. स्वतः देवयानीचा पूर्ण चेहरा सुजला आहे. अश्रूधुराची नळकांडी अगदी जवळ फुटल्यामुळे. तिला डाव्या डोळ्यात इन्फेक्शन होऊन दिसणं बंद झालं आहे. ही बातमी कळताच आम्ही दिल्लीकडे धाव घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं.


दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाचं आंदोलन, बहिणीला आंदोलनात झालेली दुखापत या गोष्टी सुदर्शनला कळू दिलेल्या नाहीत. त्याला सध्या नातेवाईकांकडे सुखरूप ठेवलं आहे. सोशल मीडिया, मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवलं असल्याचंही घोरपडे यांनी म्हटलं आहे.

पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं सांगताना घोरपडे यांनी म्हटलं की, माझ्या पक्षाने 2014 साली प्रॉमिस केलेला भारत हा नव्हता. मी काय तोंड घेऊन माझ्या पुतण्यापुतणीसमोर जाऊ शकतो? भाजपचा शहरप्रमुख स्वतःला अभिमानाने म्हणवून घेतो, पण माझ्या पुढच्या पिढीला मी काय भविष्य देत आहे. मन व्यथित झालं आहे.माझ्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवत मी भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.

स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी फेटाळला दावा

अहिल्यानगरमधील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अभय आगरकर यांनी मात्र या पोस्टवर प्रतिक्रिया देताना असा कोणीही कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये नसल्याचं सांगितलंय. अहिल्यानगरमध्ये अशा नावाचा पदाधिकारी नाही असं सांगत व्हायरल पोस्टमध्ये केलेला दावा फेटाळून लावला आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.