🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेत मोठा ‘झोल’? ऑडिट रखडल्याने जनरल मिटिंगला विलंब; नफा घटला, NPA वाढला!

कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेत मोठा ‘झोल’? ऑडिट रखडल्याने जनरल मिटिंगला विलंब; नफा घटला, NPA वाढला!

सांगली :-सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत नावाजलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा अद्याप ऑडिट पूर्ण न झाल्यामुळे रखडली आहे. गेल्या ३६ वर्षांचा सातत्यपूर्ण प्रगतीचा इतिहास लाभलेल्या या संस्थेच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सभासदांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

​नफ्यात मोठी घट, एन.पी.ए. वाढला

वर्ष २०२४-२५ मध्ये तब्बल २७ कोटी रुपयांचा नफा मिळवणाऱ्या या पतसंस्थेचा नफा २०२५-२६ या आर्थिक वर्षात थेट २० कोटींवर घसरला आहे. संस्थेचा एन.पी.ए. (NPA) मोठ्या प्रमाणावर वाढला असून कर्ज वसुली पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठेवींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, तर दुसरीकडे पिग्मी एजंट्सचे कमिशन कमी झाल्यामुळे त्यांच्यातही नाराजी आहे. तसेच, संस्था कर्मचारी प्रचंड दडपणाखाली काम करत असल्याचे चित्र आहे.

​चेअरमन, व्हाईस चेअरमनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

चेअरमन तब्येतीच्या कारणास्तव दीर्घकाळ गैरहजर राहिल्याने आणि व्हाईस चेअरमन शाखा भेटी देत नसल्याने संस्थेची प्रगती खुंटल्याचा आरोप होत आहे. तांत्रिक मुद्द्यांवरून पूर्वीच ६ संचालकांनी राजीनामे दिले आहेत. सध्या उरलेल्या ७ संचालकांपैकी तब्बल ५ संचालकांना विश्वासात न घेताच चेअरमन व व्हाईस चेअरमन संस्था चालवत आहेत. एवढेच नव्हे तर, संचालक मंडळाच्या बैठकीत बहुमताने मंजूर झालेल्या ठरावांवर कोणतीही अंमलबजावणी केली जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

​गोपनीयता वेशीवर वेशीवर टांगली!

संस्थेचे संचालक नसतानाही काही बिन-संचालक सभासद संचालक मंडळाच्या गुप्त बैठकांना उपस्थित राहत असल्यामुळे संस्थेची गोपनीयता पूर्णपणे धाब्यावर बसवण्यात आल्याची चर्चा आहे.

​सभासदांची आरपारची मागणी

अशीच परिस्थिती राहिल्यास सभासदांचा संस्थेवरील उरलासुरला विश्वासही उडून जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती चोपडे आणि व्हाईस चेअरमन अ‍ॅड. एस. पी. मगदूम यांनी कसलाही विलंब न करता तातडीने जनरल मिटिंग बोलवावी आणि संस्थेच्या खालावलेल्या आर्थिक स्थितीबाबत सर्व सभासदांना योग्य व समाधानकारक खुलासा करावा, अशी आक्रमक मागणी आता सभासद वर्गातून केली जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.