🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दिल्लीत राजकीय खळबळ: केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचा अचानक राजीनामा!

दिल्लीत राजकीय खळबळ: केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांचा अचानक राजीनामा!


गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणावरून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीने दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे.

तसेच २० जुलै रोजी हजारो विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा देखील काढला होता. मात्र, या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे देशभरातून सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यानच आता दिल्लीतून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.
केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा का दिला? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, रवनीत सिंग बिट्टू यांनी पंतप्रधानांशी चर्चा केल्यानंतरच राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रवनीत सिंग बिट्टू यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील लगेचच त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. या सर्व घडामोडींमुळे दिल्लीत नेमकं काय घडतंय? याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
रवनीत सिंग बिट्टू यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती. रवनीत सिंग बिट्टू हे मूळचे पंजाबचे आहेत. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार आहेत. त्यांच्याकडे २०२४ पासून रेल्वे राज्यमंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री पदाची जबाबदारी होती.

रवनीत सिंग बिट्टू यांनी राजीनामा का दिला?
दरम्यान, रवनीत सिंग बिट्टू यांनी राजीनामा दिल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये भारतीय जनता पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्याच्या अनुषंगाने हा मोठा फेरबदल करण्यात आल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केलं आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आता भारतीय जनता पक्षाने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्याची चर्चा आहे. याच कारणामुळे भाजपाने रवनीत सिंग बिट्टू यांना पंजाबच्या राजकारणात सक्रिय करण्यासाठी त्यांच्याकडील केंद्रीय मंत्रि‍पदाची जबाबदारी काढून घेतल्याचं बोललं जात आहे. आगामी पंजाब निवडणुकीसाठी भाजपा रवनीत सिंग बिट्टू यांना पक्षाचा एक प्रमुख चेहरा म्हणून पुढे आणण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.