देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक अत्यंत विचित्र आणि तितकाच धक्कादायक प्रकार घडला आहे. हा सारा प्रकार चेन्नईतील अड्यार भागात असलेल्या एसबीआयच्या एनआरआय शाखेमध्ये तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांची नात आणि माजी केंद्रीय मंत्री एम. के. अझागिरी यांची मुलगी कायलविझी अझागिरी यांनी थेट ब्रँच मानेजरला मारहाण केली. कायलविझी अझागिरी यांनी एसबीआयच्या ब्रँच मॅनेजरच्या कानशीलात लगावल्याचं सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे.
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना 20 जुलै रोजी घडली आहे. कायलविझी यांच्या मालकीच्या इमारतीमधील एका गाळ्यामध्ये एसबीआयची शाखा आहे. भाडेतत्वावर एसबीआय बँकेने या शाखेसाठीची जागा कायळविझी यांच्याकडून घेतली आहे. इमारतीतील बिघडलेल्या लिफ्टबाबत व्यवस्थापक हर्षीन सिंग यांनी वारंवार तक्रार केली होती. प्रतिनिधींकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी थेट कायलविझीकडे संपर्क साधला. यावरून वाद झाला. कायलविझी शाखेत आल्या, मॅनेजरसोबत जोरदार भांडण झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नेमका घटनाक्रम दिसत आहे.कायलविझी यांनी अनुवटीखाली हात ठेवून मॅनेजरच्या बसण्याच्या स्टाईलची नक्कल करत त्याची खिल्ली उडवली. मॅनेजरवर कृतीमधून उपहासात्मक टीका केल्यानंतर कायलविझी यांनी त्याला थेट कानशीलात लगावली. यावेळी कायलविझी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्यांचा हात धरून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
टीकेची झोड
एसबीआयच्या बँक शाखेतील ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर साधारण आठवड्याभराने सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. अनेकांनी कायलविझी यांच्या वागण्यावर आक्षेप घेत माजी मुख्यमंत्र्याची नात असल्याने कसंही वागण्याची परवानगी कायलविझी यांना मिळते का? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरु
एसबीआयच्या चीफ मॅनेजर नामचिवायम यांनी अड्यार पोलिसांकडे कायलविझी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार कायलविझी यांच्याविरुद्ध अश्लील शब्द वापरणे, घरफोडी, स्वेच्छेने इजा पोहोचवणे, गुन्हेगारी धमक देण्याच्या कलामांअंतर्गत भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये सध्या तपास सुरू आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सन्मान ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असं एसबीआयने अधिकृतरित्या जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.