सांगलीच्या विकासासाठी आमदार सुधीरदादा गाडगीळ आक्रमक; मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व शेरीनाला STP साठी १९३ कोटींच्या निधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!


सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि शहराच्या पायाभूत सुविधा भक्कम करण्यासाठी सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन तब्बल १९३ कोटींच्या भरीव निधीची आग्रही मागणी केली आहे. या संदर्भात आमदार गाडगीळांनी मुख्यमंत्र्यांना सविस्तर निवेदनाद्वारे सांगलीच्या दोन अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची तातडीची गरज पटवून दिली.

​१. १०० कोटींची अत्याधुनिक मध्यवर्ती प्रशासकीय इमारत
​विजयनगर येथील सिटी सर्व्हे क्र. १२५ मधील महापालिकेच्या हक्काच्या जागेवर नागरिकांच्या सोयीसाठी अत्याधुनिक आणि सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज अशी नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभारण्याचा मानस आहे. सध्या राजवाडा चौक येथील महापालिकेची विद्यमान इमारत वाढत्या कामकाजाच्या तुलनेत अपुरी पडत आहे. नवीन इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असल्याने शासकीय विभागांमध्ये सुलभ समन्वय राहील आणि नागरिकांना एकाच छताखाली जलद व पारदर्शक सेवा मिळतील. यासाठी आमदार गाडगीळ यांनी १०० कोटींच्या विशेष निधीची मागणी केली आहे.
​२. ९३ कोटींचा प्रलंबित शेरीनाला मल शुद्धीकरण प्रकल्प (STP)
​राज्यातील नागरी स्वच्छता व पिण्याच्या पाण्याच्या सुविधांसाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने सुमारे ५,००० कोटींचा निधी उभारला जात आहे. या योजनेअंतर्गत प्रलंबित 'शेरीनाला वखार भाग उच्च मल शुद्धीकरण केंद्र (STP)' व इतर कामांसाठी ९३ कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडे २६ सप्टेंबर २०२४ पासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळवून निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मनपा क्षेत्रातील सांडपाण्याचा आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्न कायमचा सुटणार आहे.

​"सांगली शहराच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प अत्यंत महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सांगलीच्या विकासाबाबत नेहमीच सकारात्मक राहिले असून, या दोन्ही प्रकल्पांना राज्य सरकारकडून लवकरच प्रशासकीय मान्यता व निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल," असा विश्वास आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.