🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पाकिस्तानात धोक्याची घंटा! सिंध प्रांतात एचआयव्ही पसरवणारा 'तो' निष्काळजीपणा; समोर आलं धक्कादायक वास्तव!

पाकिस्तानात धोक्याची घंटा! सिंध प्रांतात एचआयव्ही पसरवणारा 'तो' निष्काळजीपणा; समोर आलं धक्कादायक वास्तव!


दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तान सध्या एका गंभीर संकटाच्या छायेत सापडला आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या या देशात एचआयव्ही संसर्गाचा भीषण उद्रेक झाला आहे. पाकिस्तानमधील कराची शहरातील तब्बल १३० हून अधिक लोकांची HIV चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. या रुग्णांमध्ये बहुतांश लहान मुलांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. संक्रमित रुग्णांचा कराची येथील ‘कुलसूम बाई वालिका’ रुग्णालयाशी संबंध जोडला जात आहे. शहरात एकाच वेळी शेकडो लोक एचआयव्ही बाधित आढळल्याने संपूर्ण पाकिस्तानात मोठी घबराट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर हा संसर्ग पसरण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊ…

पाकिस्तानात एचआयव्हीचा मोठा उद्रेक

पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, कराची येथे एचआयव्हीच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तपासात सरकारी रुग्णालयातील सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाले. या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत १३० जणांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले. याबाबत सिंध प्रांताचे कामगार मंत्री सईद घानी यांनी सांगितले की, कुलसुम बाई वालिका रुग्णालयाच्या परिसरात आणि आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या तब्बल १० हजारपेक्षा जास्त लोकांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी १२० लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले. याशिवाय, कराचीतील लांधी परिसरात स्वतंत्रपणे करण्यात आलेल्या तपासणीत आणखी १० जणांना हा संसर्गाने विळखा घातल्याचे उघड झाले. या उद्रेकाची पहिली नोंद नोव्हेंबर २०२५ मध्ये झाली होती. त्यावेळी कुलसुम बाई वालिका रुग्णालयात उपचार घेतलेल्या मुलांमध्ये एचआयव्हीची लक्षणे आढळल्याने त्याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

एचआयव्हीच्या उद्रेकामागचे कारण काय?
एचआयव्हीच्या वाढत्या प्रकरणानंतर पाकिस्तान सरकारने या घटनेची चौकशी सुरू केली. १४ जुलै रोजी सिंधचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी सांगितले की, दोन अंतर्गत चौकशी अहवालांमध्ये रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी समोर आल्या. कुलसुम बाई वालिका रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संसर्ग प्रतिबंधक नियमांचे पालन केले नाही. आवश्यक सुरक्षात्मक साधनांचा योग्य वापर करण्यात आला नाही. तसेच, एकदाच वापरासाठी असलेल्या इंजेक्शनच्या विल्हेवाट प्रक्रियेतही गंभीर निष्काळजीपणा आढळून आला. सिंधच्या आरोग्य विभाग पथकाने रुग्णालयाची पाहणी केली असता अनेक मूलभूत सुरक्षा उपायांचे पालन केले नसल्याचे उघड झाले. वापरलेली इंजेक्शने कशी नष्ट केली जातात किंवा त्यासाठी काही पर्यायी व्यवस्था आहे का, याबाबत कर्मचारी समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना संसर्ग प्रतिबंध व नियंत्रण, यासंदर्भात कोणतेही औपचारिक प्रशिक्षण देण्यात आले नव्हते.
तपासात कोणत्या त्रुटी आढळून आल्या?

कुलसुम बाई वालिका रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ऑटोक्लेव्ह यंत्राची कार्यस्थितीही तपासणीदरम्यान निश्चित करता आली नाही. तसेच, तपासणीच्या वेळी परिचारिका आणि शस्त्रक्रिया विभागातील कर्मचारी ड्युटीवर उपस्थित नसल्यामुळे नियमित संसर्ग नियंत्रण पद्धतींचे मूल्यमापन करणे कठीण झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. तपासात वैद्यकीय कचऱ्याचे नियमांनुसार वर्गीकरण आणि विल्हेवाट लावली जात नसल्याचेही आढळले. याशिवाय, वैद्यकीय कचरा संकलन आणि विल्हेवाटीची जबाबदारी असलेल्या खासगी कंत्राटदाराला आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले नव्हते. त्यामुळे एचआयव्ही संसर्गाचा धोका अधिकच वाढल्याचे तपासात स्पष्ट झाले.

पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई
कराचीतील सरकारी रुग्णालयांशी संबंधित एचआयव्ही उद्रेकातील गंभीर निष्काळजीपणा उघड झाल्यानंतर पाकिस्तान सरकारने बाधितांच्या उपचारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. सिंधचे कामगार मंत्री सईद घानी यांनी सांगितले की, आतापर्यंत एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळलेल्या १२० जणांना सरकारी खर्चाने उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बाधित सर्व मुलांवर इंडस रुग्णालय, आगा खान रुग्णालय आणि दाऊ युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस यांसह पाच प्रमुख वैद्यकीय संस्थांमध्ये मोफत उपचार केले जात आहेत. बाधितांच्या दीर्घकालीन उपचारासाठी सरकारने दोन अब्ज पाकिस्तानी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीचे व्यवस्थापन आणि उपचारांच्या धोरणावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची ‘स्थायी समिती’ स्थापन केली जाणार आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या डॉक्टरांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, तसेच त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेही दाखल केले जातील, असा इशारा सरकारच्या वतीने देण्यात आला आहे. सध्या या प्रकरणातील ३७ डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
सिंध प्रांतातील मंत्र्याने काय सांगितले?

दरम्यान, कुलसुम बाई वालिका रुग्णालयाशी संबंधित सर्व संसर्गाची प्रकरणे ऑक्टोबर २०२५ पूर्वीची आहेत. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेतलेला एकही व्यक्ती एचआयव्ही बाधित आढळून आलेला नाही. मात्र, दोन्ही रुग्णालये आणि आसपासच्या परिसरात एचआयव्ही तपासणी मोहीम अद्याप सुरू असल्याचे सईद घानी यांनी सांगितले. या प्रकरणात स्वत:ची जबाबदारी विचारण्यात आल्यानंतर घानी यांनी माझ्या राजीनाम्यामुळे हा प्रश्न सुटणार असेल, तर मला त्याबाबत कोणताही आक्षेप नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे- पाकिस्तानचे केंद्रीय आरोग्यमंत्री मुस्तफा कमाल यांनी देशभरात शस्त्रक्रियेपूर्वी एचआयव्ही चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रुग्णालयांमध्ये संसर्गाचा धोका कमी करणे आणि रुग्णांची सुरक्षितता सुनिश्चित करणे हा त्यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

आरोग्य व्यवस्थाच संसर्गाला कारणीभूत?
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने पाकिस्तानात एचआयव्हीचे संक्रमण सर्वाधिक वेगाने वाढत असल्याचा इशारा दिला होता. २०१० मध्ये सुमारे पाकिस्तानात तब्बल १६ हजार एचआयव्हीची प्रकरणे नोंदवली गेली होती. २०२४ पर्यंत ती वाढून जवळपास ४८ हजारांवर पोहोचली आहेत, म्हणजेच संक्रमित रुग्णांमध्ये २०० टक्क्यांची वाढ झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाकिस्तानात सुमारे ३५ हजार लोक एचआयव्हीसह जीवन जगत आहेत. मात्र, त्यापैकी जवळपास ८० टक्के लोकांना स्वतःला एचआयव्हीची लागण झाल्याची माहितीच नाही. विशेषतः लहान मुलांमधील एचआयव्ही संसर्गाची परिस्थिती अत्यंत भयानक आहे. १४ वर्षाखालील वयोगटातील एचआयव्ही बाधित मुलांची संख्या २०१० मधील ५३० वरून २०२३ मध्ये १,८०० वर पोहोचली आहे. 

सध्या एचआयव्हीग्रस्त मुलांपैकी केवळ ३८ टक्के मुलांनाच आवश्यक उपचार मिळत आहेत. तसेच, आईकडून बाळाला एचआयव्हीचा संसर्ग होऊ नये यासाठी औषधोपचार आवश्यक असलेल्या गर्भवती महिलांपैकी फक्त १४ टक्के महिलांनाच उपचार उपलब्ध होत आहेत. कराचीतील आगा खान रुग्णालयातील संसर्गजन्य रोग विभागाचे प्राध्यापक डॉ. सय्यद फैसल महमूद यांनी सांगितले की, हा उद्रेक केवळ एका रुग्णालयाशी संबंधित नाही. असुरक्षित इंजेक्शन वापरण्याच्या पद्धती आणि संसर्ग प्रतिबंधक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यांमुळेच ही समस्या उद्भवत आहे. एचआयव्हीचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केवळ उपचार पुरेसे नसून, सुरक्षित वैद्यकीय पद्धतींची काटेकोर अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृती यावर भर देणे अत्यावश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.