'आमचं लग्न ठरलं होतं; महाबळेश्वरला हॉटेलसुद्धा बुक" ZP सदस्याच्या अत्याचार प्रकरणात मोठा खुलासा; तरुणी म्हणाली" शरीरसंबंध ठेवत त्याने.
पुणे: बारामती तालुक्यातील एका तरुणीने पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरोधात गंभीर आरोप करत आपली बाजू प्रसारमाध्यमांसमोर मांडली आहे. लग्नाचे आश्वासन देत अनेक वर्षे फसवणूक केली, विश्वास संपादन करून वारंवार शारीरिक संबंध ठेवले आणि आपले शारीरिक शोषण केल्याचा आरोप तिने केला आहे.
या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना पीडित तरुणीने सांगितले की, तिचे आणि मंगेश जगताप यांचे लग्न ठरले होते. महाबळेश्वर येथे लग्नासाठी रिसॉर्टचे बुकिंग करण्यात आले होते आणि 29 व 30 तारखेला विवाह सोहळा होणार असल्याचे ठरले होते. या सर्व बाबींचे पुरावे आपल्या जवळ असल्याचा दावा तिने केला.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, लग्नाचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन करण्यात आला आणि त्याच आधारे तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले. मात्र, लग्न न करता तिची फसवणूक करण्यात आली आणि तिचे शारीरिक तसेच मानसिक शोषण झाल्याचा आरोप तिने केला आहे.
तिने पुढे असा दावाही केला की, गेल्या काही महिन्यांपासून मंगेश जगताप तिला भेटणे टाळत असून तिच्यापासून दूर राहत आहेत. “21 वर्षे माझ्या आयुष्याशी खेळ का केला?” असा सवालही तिने उपस्थित केला. याशिवाय, या प्रकरणात मंगेश जगताप यांच्या कुटुंबातील काही सदस्य, पोलीस सेवेत असलेली त्यांची मेव्हणी तसेच अमर जगताप आणि रणजीत तांबडे यांचाही सहभाग असल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या घटनेनंतर तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, माळेगाव पोलीस ठाण्याकडून प्रकरणाचा तपास सुरू आहे. तक्रारीतील सर्व आरोपांची पडताळणी करून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.