₹10 हजार पगार, अन् खात्यात तब्बल ₹17 कोटींची उलाढाल! GST ची नोटीस येताच सिक्युरिटी गार्डचा उडाला थरकाप; पोलिसांनाही धक्का, नोकरीवरही गदा!
महिन्याला अवघे १० हजार रुपये कमवून कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाला जीएसटी विभागाने नोटीस पाठल्याची घटना समोर आली आहे. सिक्युरिटी गार्डने आपल्या उभ्या आयुष्यात कधीही लाखभर रुपयेही एकत्र पाहिले नाहीत, असं असताना आता या सिक्युरिटी गार्डला जीएसटी (GST) विभागाकडून तब्बल १७ कोटींहून अधिक रुपयांच्या उलाढालीची नोटीस पाठवण्यात आली आहे.
सिक्युरिटी गार्डला ही नोटीस आल्यानंतर कुणाला काहीच समजत नव्हतं. मात्र जेव्हा स्कॅम कळाला, तेव्हा पोलिसांच्याही पायाखालची जमीन हादरली. कानपूरच्या नौबस्ता येथील रहिवासी ओमजी शुक्ला यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला असून, त्यांना ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त कर (Tax) भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
नोटीस आली अन् नोकरी गेली, रेशन कार्डही झालं रद्द
२१ सप्टेंबर २०२५ रोजी मिळालेल्या या जीएसटी नोटीसने शुक्ला यांच्या आयुष्यात मोठे वादळ आणलं आहे. अचानक ३ कोटींच्या कराची थकबाकी आणि १७ कोटींच्या उलाढालीचा डोंगर पाहून ते हादरले. मदत मागण्यासाठी त्यांनी विविध सरकारी कार्यालयांच्या चकरा मारल्या. या मानसिक त्रासात आणि फेऱ्या मारण्यात त्यांची सिक्युरिटी गार्डची नोकरीही गेली. इतकेच नव्हे, तर जीएसटी रेकॉर्डवर करोडपती दिसत असल्याने त्यांचं रेशन कार्ड रद्द करण्यात आलं आणि इतर सरकारी सुविधाही बंद झाल्या.
कमिशनरसमोर अश्रू अनावर; क्राईम ब्रांच करणार तपास
गेल्या वर्षभरापासून न्यायासाठी भटकणाऱ्या शुक्ला यांनी अखेर कानपूरचे पोलीस कमिशनर रघुवीर लाल यांची भेट घेतली. कमिशनरसमोर गाऱ्हाणे मांडताना शुक्ला यांना अश्रू अनावर झाले. कोणीतरी त्यांच्या पॅन कार्ड आणि वैयक्तिक कागदपत्रांचा गैरवापर करून त्यांच्या नावे बनावट कंपनी (Firm) स्थापन केली असावी, असा प्राथमिक संशय आहे.
पोलीस कमिशनर यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून नौबस्ता पोलिसांना तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असून, संपूर्ण प्रकरणाचा तपास 'क्राईम ब्रांच'कडे सोपवला आहे.
जीएसटी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, व्यापारी संघटनेने या प्रकरणी जीएसटी अधिकाऱ्यांच्या पडताळणी प्रक्रियेवरच गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवा जीएसटी क्रमांक जारी करण्यापूर्वी जागेची पाहणी, फोटो आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाते. मग एका साध्या सुरक्षारक्षकाच्या नावे इतकी मोठी उलाढाल नोंदवली जाताना योग्य पडताळणी झाली नव्हती का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. सध्या रोजगाराअभावी आर्थिक संकटात सापडलेले ओम जी शुक्ला यांना आता क्राईम ब्रांचच्या तपासाकडून सत्याचा उलगडा होण्याची आणि न्याय मिळण्याची आशा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.