🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम

गर्भलिंग निदान प्रकरणात २५ लाखांची डील अन् ५.५ लाख घेताना दोन दलाल ACBच्या जाळ्यात; डॉक्टरने केला पोलिसांचाच गेम


अकलूजमध्ये गर्भलिंगनिदान चाचणीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.


संशयित डॉक्टर दांपत्याला अटक न करण्यासाठी पोलिसांच्या नावाने तब्बल २५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात ५.५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन दलालांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पथकाने शुक्रवारी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर अकलूजचे पोलीस उपअधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शुक्रवारी दुपारी एसीबीचा सापळा

माळशिरस-पिलीव मार्गावरील ब्रिजखाली शुक्रवारी दुपारी एसीबीच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस शिपायाच्या नावाने साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना आबा वळकुंदे आणि महादेव माने या दोन दलालांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे अकलूज पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके यांच्या नावाने पाच लाख रुपये, तर पोलिस शिपाई राहुल वाघ यांच्या नावाने ५० हजार रुपयांची मागणी झाल्याचा आरोप आहे. दलालांना अटक केल्यानंतर संबंधित पोलिस शिपाई आणि PSIविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. उपअधीक्षक वाळके यांच्या भूमिकेबाबत चौकशी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

डमी रुग्णाच्या माध्यमातून रॅकेटचा पर्दाफाश

दरम्यान, अकलूज पोलिसांनी १८ ऑगस्ट रोजी डमी रुग्ण पाठवून गर्भलिंगनिदान चाचणीच्या कथित रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या कारवाईनंतर संबंधित डॉक्टर दांपत्यावर कारवाई होण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना अटक न करण्यासाठी २५ लाख रुपयांची तडजोड मागितल्याचा आरोप करण्यात आला. या कथित व्यवहाराची माहिती मिळाल्यानंतर पुणे एसीबीकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने पडताळणी करून सापळा रचला. यापूर्वी या प्रकरणात १० लाख रुपयांची रक्कम स्वीकारल्याचाही आरोप समोर आला आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी ५.५ लाख रुपये देण्याचे ठरले होते. ही रक्कम स्वीकारण्याच्या वेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत दोन्ही दलालांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर गर्भलिंगनिदान रॅकेटसोबतच पोलिसांकडून कथित लाचखोरीचा प्रकारही चर्चेत आला आहे. संपूर्ण प्रकरणात नेमकी कोणाची भूमिका होती, लाचेची मागणी कुणाच्या सांगण्यावरून करण्यात आली आणि यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता एसीबीकडून केला जात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.