नागपूर: नागपूर पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर अंकुशराव झोल असे आत्महत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव असून ते पोलीस आयुक्त कार्यालयाच्या अर्ज शाखेत सेवा बजावत होते.
ही घटना पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस क्वार्टरमध्ये मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर झोल हे रात्री कर्तव्यावरून घरी परतल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांसोबत एकत्र जेवण केले. जेवण झाल्यानंतर त्यांची पत्नी मुलांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. त्याच वेळी झोल यांनी साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. पत्नी मुलांना झोपवून बाहेर आली असता, झोल हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
रुग्णालयात मृत घोषित, गिट्टीखदान पोलिसांकडून तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच सहकाऱ्यांनी तातडीने झोल यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तेथे कोणतीही सुसाईड नोट आढळून आलेली नाही. गिट्टीखदान पोलिसांनी सध्या आकस्मिक निधनाची नोंद करून सखोल तपासाला सुरुवात केली आहे.
पोलीस दलात हळहळ
घटनास्थळी सुसाईड नोट न सापडल्यामुळे झोल यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. झोल यांच्यावर कामाचा काही ताण होता की वैयक्तिक कारणांमुळे ते तणावात होते, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. अत्यंत मनमोकळ्या आणि हसऱ्या स्वभावाचे अधिकारी म्हणून ओळख असलेल्या झोल यांच्या अशा अचानक जाण्याने पोलीस दलातील हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळ गावी होणार अंत्यसंस्कार
नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव जालना जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले आहे. उद्या त्यांच्या मूळ गावी कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पोलीस तपासाची चक्रे फिरत असून शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच या आत्महत्येमागचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.