छत्रपती संभाजीनगर: प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आणि संतापाच्या भरात नागरिकांकडून टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातून समोर आली आहे. रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनाला पोलिसांनी जॅमर लावल्यानंतर तो काढण्यासाठी चालकाने वारंवार विनंती केली.
मात्र, प्रशासनाकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्याने संतापलेल्या चालकाने चक्क स्वतःचीच कार भररस्त्यात पेटवून दिली. या प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस आणि महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित वाहनचालकाने आपली चारचाकी गाडी रस्त्याच्याकडेला पार्क केली होती. नो-पार्किंग किंवा वाहतुकीस अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पोलीस प्रशासनाने या वाहनाला जॅमर लावला. काही वेळात चालक त्या ठिकाणी पोहोचला आणि त्याने जॅमर काढण्यासाठी तेथे उपस्थित पोलीस आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडे विनंती केली. चालकाचा दावा आहे की, त्याने वारंवार विनंती करूनही प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.
संतापला आणि उचलले टोकाचे पाऊल
जॅमर काढण्यासाठी सहकार्य मिळत नसल्याचे पाहून आणि प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाला कंटाळून चालकाचा संयम सुटला. संतापाच्या भरात त्याने थेट स्वतःच्याच कारला आग लावली. काही मिनिटांतच वाहनाने पेट घेतला अन् धुराचे लोट आणि आगीच्या मोठ्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. भररस्त्यात घडलेल्या या भीषण प्रकारामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट पसरली अन् घटनास्थळी मोठी गर्दी जमली.
परिसरात काही काळ प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण
भररस्त्यात वाहनाला आग लावल्यामुळे परिसरात काही काळ प्रचंड तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर स्थानिक पोलीस आणि महापालिकेच्या दंड वसुलीच्या पद्धतीवर आणि नागरिकांशी होणाऱ्या वर्तनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
या धक्कादायक घटनेमुळे शहरातील वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दंडात्मक कारवाई करताना नागरिकांची पिळवणूक केली जाते का, अशा चर्चांना उधाण आले आहे. याप्रकरणी संबंधित जबाबदार पोलीस अथवा महापालिका कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.