मुंबई : कर्ज थकल्यानंतर बँकेकडून जप्तीची नोटिस मिळाल्यावर एका शेतकऱ्याने चक्क अनोखाच मार्ग निवडला. बँकेने म्हैस जप्त करण्याचे सांगितल्यानंतर शेतकरी स्वतःच म्हशीला घेऊन बँकेत पोहोचला. एवढेच नाही तर म्हशीला थेट लिफ्टमधून बँक मॅनेजरच्या केबिनपर्यंत नेल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित शेतकऱ्यावर बँकेचे कर्ज थकीत होते. कर्जाचे हफ्ते वेळेवर न भरल्याने बँकेकडून त्याला वारंवार नोटिस पाठवण्यात येत होती. अखेर बँकेकडून त्याच्या म्हशीची जप्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र बँकेच्या या कारवाईनंतर शेतकऱ्याने जे केले त्याची बँक कर्मचाऱ्यांनाही अपेक्षा नव्हती. म्हैस जप्त करण्यासाठी बँकेचे अधिकारी येण्याची वाट न पाहता शेतकरी स्वतःच म्हशीला घेऊन बँकेत दाखल झाला. विशेष म्हणजे शेतकरी म्हशीला घेऊन चक्क लिफ्टमध्ये गेला. लिफ्टमधून थेट त्याने म्हशीला मॅनेजरच्या केबिनसमोर नेले. यावेळी लिफ्टमध्ये आधीपासून असलेल्या एका व्यक्तीलाही म्हैस पाहून आश्चर्य वाटले.
बँक मॅनेजरसमोर म्हैस आणल्यानंतर शेतकऱ्याने, 'ती तशीही दूध देत नाहीये. तुम्ही तिला ठेवू शकता', अशा आशयाची भूमिका घेतल्याचे सांगितले जाते. बँकेत म्हैस पाहून उपस्थित कर्मचारी आणि ग्राहकांमध्येही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शेतकऱ्याने बँकेच्या जप्तीच्या नोटिशीला दिलेल्या या अनपेक्षित उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. अनेकजण या घटनेवर मजेशीर प्रतिक्रिया देत असून, शेतकऱ्याला जप्तीची नोटिस पाठवणे बँकेला महागात पडले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.