🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अमित शहांशी चर्चेनंतर पक्ष विलीन केला अन् आता त्याच नेत्याचा भाजपला रामराम; जाहीर कार्यक्रमात केली घोषणा

अमित शहांशी चर्चेनंतर पक्ष विलीन केला अन् आता त्याच नेत्याचा भाजपला रामराम; जाहीर कार्यक्रमात केली घोषणा


दक्षिण भारतातील राजकारणात भाजपला सातत्याने धक्के बसत आहे. तमिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता केरळमधील ज्येष्ठ नेत्यालनेही पक्षाला रामराम ठोकला आहे. ज्येष्ठ मल्याळम चित्रपट अभिनेते आणि केरळ भाजपचे उपाध्यक्ष देवन यांनी रविवारी पक्ष सोडत असल्याची घोषणा केली.

देवन यांनी एका कार्यक्रमात पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करत उपाध्यक्ष पदासह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. समाजसुधारक नारायण गुरु यांच्या विचारांपासून भाजप दूर गेल्याचा आरोप देवन यांनी केला आहे. केरळ भाजपमध्ये सध्या अनेक मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीतील निधीचा खासगी वापरासाठी गैरवापर, गटबाजी, नेतृत्वाचे दुर्लक्ष आदी आरोप होत आहे. 

पक्षातील वादाच्या पार्श्वभूमीवर देवन यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. देवन यांची २००४ मध्ये राजकारणात एन्ट्री झाली आहे. त्यांनी केरळ पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना केली होती. मात्र, राज्यात त्यांच्या पक्षाला यश मिळाले नव्हते. त्यांनी २०२१ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेनुसार भाजपमध्ये आपला पक्ष विलीन केला होता. देवन यांनी २००४ आणि २००६ मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली होती. पण त्यांचा पराभव झाला होता.

देवन हे २०२३ पासून भाजप केरळचे उपाध्यक्ष होते. आपल्या राजीनाम्याविषयी सविस्तरपणे बोलताना ते म्हणाले, नारायण गुरु यांच्या प्रगतिशील सामाजिक न्यायाच्या विचारधारेपासून भाजप दूर गेला आहे. माझे राजकारण गुरुंच्या विचारांवर आधारलेले आहे. मात्र मागील पाच वर्षांत पक्षात ते कुठेच दिसले नाहीत. माझ्या राजकीय भूमिकेशी पक्ष सुसंगत नसल्याचे जाणविले. त्यानंतरही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी जोमाने काम केले, असेही देवन यांनी म्हटले आहे. 

पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय वर्षाच्या सुरूवातीलाच घेतला होता, पण याबाबतची घोषणा कनिचुकुलंगरा मंदिरातच करण्याची वाट पाहत होतो, असे देवन म्हणाले आहेत. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात मांडण्यात आलेल्या आणि नंतर जेपीसीकडे पाठविण्यात आलेल्या परकीय योगदान नियमन कायद्यावरूनही केरळमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची भीती नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे. यापार्श्वभूमीवर देवन यांच्या राजीनाम्याला महत्व प्राप्त झाले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.