नागरिकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपण्यासाठी जगप्रसिद्ध उद्योजक एलॉन मस्क यांनी धाडसी पाऊल उचलले आहे. 'एक्स'वरील एखादी पोस्ट काढून टाकण्याचे आदेश सरकारने दिल्यास ते आता युजरला कळणार आहे. 'एक्स' प्लॅटफॉर्मवर तसे स्पष्टपणे नमूद केले जाणार आहे. त्यामुळे तुमच्या अभिव्यक्तीवर गदा आणणाऱया सेन्सॉरशिपचा खरा चेहरा उघड होऊ शकणार आहे.
'एक्स'सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेकदा युजर्सच्या पोस्ट इनव्हिजिबल केल्या जातात किंवा थेट काढून टाकल्या जातात. मात्र आपली पोस्ट कोणाच्या आक्षेपावरून किंवा आदेशावरून काढण्यात आली हे आतापर्यंत युजरला कळत नव्हते. आता ते कळू शकणार आहे. मजकूर नियंत्रण (कंटेंट मॉडरेशन), शिफारस अल्गोरिदम (रेकमेंडेशन अल्गोरिदम) आणि ऑनलाइन अभिव्यक्तीमधील अधिकृत हस्तक्षेपाबाबत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी मस्क यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एखादा मजकूर काढून टाकण्याची किंवा त्यावर निर्बंध घालण्याची सरकारी केलेली विनंती युजरला एक्सवर दिसणार आहे. मस्क यांनी एक्सवर तसे स्पष्ट केले आहे.सरकार कोणत्या प्रकारच्या पोस्ट काढून टाकण्याचे आदेश देते हे समजू शकणार.एक्स खात्यावर निर्बंध घालण्याची विनंती कोणत्या परिस्थितीत केली जाते हे कळणार.अशी विनंती करणाऱया एजन्सींबद्दलचा तपशील आणि त्यासाठी दिलेली कायदेशीर कारणे उघड होणार.सर्वच प्लॅटफॉर्म्सनी अनुकरण करावे!मस्क यांनी घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून सोशल मीडियातील सर्वच प्लॅटफॉर्म्सनी या निर्णयाचे अनुकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. कोणत्याही सरकारला सोशल मीडियातील एखादा मजकूर किंवा फोटो-व्हिडीओ खटकत असतील व तो काढून टाकायचा असेल तर तशी कारवाई उघडपणे करावी, असे मत नेटकऱयांनी व्यक्त केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.