🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

झाकली मूठ सव्वा लाखाची! Blinkit च्या 'डार्क स्टोअर'वर मुंढेंची रेड;10 मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी बंद दाराआड नेमकं चालतं तरी काय?

झाकली मूठ सव्वा लाखाची! Blinkit च्या 'डार्क स्टोअर'वर मुंढेंची रेड;10 मिनिटांच्या डिलिव्हरीसाठी बंद दाराआड नेमकं चालतं तरी काय?


मुंबई: 10 मिनिटांत घरपोच किराणा अन् भाजीपाला पोहोचवणाऱ्या 'ब्लिंकइट' (Blinkit) या क्विक-कॉमर्स कंपनीच्या गोदामाला आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान गोदामातील अस्वच्छता, मुदत संपलेले (Expired) अन्नपदार्थ आणि अन्न सुरक्षेच्या नियमांचे उघडउघड उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या धडक कारवाईमुळे क्विक-कॉमर्स क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मात्र या कारवाईमुळे हिवाशी भागातील 'डार्क स्टोअर्स' चं सत्य समोर आलं आहे. 
ॲपवर ऑर्डर टॅप केली की अवघ्या 10 मिनिटांत भाजी, दूध आणि किराणा सामान दाराशी हजर होतं. परंतु, ही सेवा देणाऱ्या कंपन्यांचे 'डार्क स्टोअर्स' नक्की कसे चालतात आणि बंद दाराआड ठेवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या सुरक्षेचं काय? हा गंभीर प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. रहिवाशी भागात गपचूप चालणाऱ्या या गोदामांवर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मोर्चा वळवला असून, अनेक ठिकाणी सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे.
काय असते 'डार्क स्टोअर'?

सामान्य ग्राहकांना आत प्रवेश नसलेले पण केवळ ऑनलाईन ऑर्डर्स पॅक करून पाठवण्यासाठी वापरले जाणारे छोटे गोदाम म्हणजे 'डार्क स्टोअर'. शहरात 1 ते 3 किलोमीटरच्या परिघात ही गोदामे उभारली जातात. बाहेरून पाहिल्यास बंद दुकान किंवा साधे गोदाम दिसणाऱ्या जागेत 24 तास अहोरात्र धावपळ सुरू असते. 

कसे चालते हे नेटवर्क?
ग्राहकाने ॲपवरून ऑर्डर नोंदवताच ती जवळच्या डार्क स्टोअरमध्ये पोहोचते. तिथे तैनात असलेला कर्मचारी अवघ्या दीड-दोन मिनिटांत रॅकवरून वस्तू गोळा करतो (पिकिंग), त्यांची बॅग तयार करतो आणि बाहेर उभ्या असलेल्या डिलिव्हरी पार्टनरकडे सोपवतो. या संपूर्ण प्रक्रियेत केवळ स्पीडला महत्त्व दिले जाते.
सुरक्षा मानकांचे पालन की सर्रास उल्लंघन?

रहिवाशी भागात इमारतींच्या तळघरात किंवा गल्लीबोळात चालणाऱ्या या डार्क स्टोअर्समध्ये अन्न सुरक्षा मानकांकडे (FSSAI norms) दुर्लक्ष होत असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. बंद दाराआड पुरेशी हवा खेळती नसणे, दमट वातावरण आणि उंदीर-झुरळांचा वावर यामुळे भाजीपाला व अन्नपदार्थ दूषित होण्याचा धोका असतो. काही मिनिटांत डिलिव्हरी देण्याच्या गडबडीत मुदत संपलेले (Expired) पदार्थ किंवा बुरशी लागलेले जिन्नस ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण वाढले आहे. दूध, लोणी, चीज आणि आईस्क्रीमसारख्या नाशवंत वस्तूंसाठी आवश्यक असणारे फ्रीझरचे तापमान योग्य प्रकारे न राखल्याने अन्नाचा दर्जा घसरतो.

प्रशासनाचा कारवाईचा बडगा
एफडीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंद दाराआड काम चालत असले तरी अन्न सुरक्षा कायदा या डार्क स्टोअर्सनाही लागू होतो. ज्या गोदामांमध्ये अस्वच्छता, परवान्याचा अभाव किंवा नियमभंग आढळेल, त्यांचे परवाने थेट निलंबित करून दुकाने सील केली जात आहेत. घाईघाईत 10 मिनिटांत वस्तू मागवताना आपण आरोग्याशी तडजोड तर करत नाही ना? असा प्रश्न आता या कारवाईनंतर जागृत ग्राहकांकडून विचारला जात आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.