🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

इंदिरा गांधी हत्या प्रकरणातील आरोपीचा मुलगा आता राजकीय मैदानात; पंजाब निवडणुकीसाठी तिकीट जाहीर !

इंदिरा गांधी हत्या प्रकरणातील आरोपीचा मुलगा आता राजकीय मैदानात; पंजाब निवडणुकीसाठी तिकीट जाहीर !


पंजाबच्या राजकारणात २०२७च्या विधानसभा निवडणुकीआधीच एका उमेदवारीने मोठी राजकीय खळबळ उडवली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या कटातील दोषी ठरवून १९८९ मध्ये फाशी देण्यात आलेल्या केहर सिंह यांचा मुलगा 'सतवंत सिंह' आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. 
तुरुंगात असलेले खडूर साहिबचे खासदार अमृतपाल सिंह यांच्याशी संबंधित 'शिरोमणी अकाली दल (वारिस पंजाब दे)' या राजकीय गटाने २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी सतवंत सिंह यांच्या नावाची पहिली उमेदवारी जाहीर केल्याचा दावा करण्यात आला आहे.
या घोषणेमुळे पंजाबच्या राजकारणात जुन्या जखमांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. कारण सतवंत सिंह यांचे वडील ‘केहर सिंह’ यांना इंदिरा गांधी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं होतं. 

६ जानेवारी १९८९ रोजी तिहार तुरुंगात केहर सिंह यांना फाशी देण्यात आली. इंदिरा गांधी यांची हत्या मात्र ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी केली होती.

बस्सी पठाणा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
मिळालेल्या माहितीनुसार, ६१ वर्षीय सतवंत सिंह यांना फतेहगड साहिब जिल्ह्यातील बस्सी पठाणा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मुस्तफाबाद गावचे रहिवासी असलेले सतवंत सिंह हे बँकेतून निवृत्त झाले आहेत. त्यांची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे. 

विशेष म्हणजे, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंह खालसा यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. सरबजीत सिंह खालसा हे इंदिरा गांधींची हत्या करणाऱ्या बेअंत सिंह यांचे पुत्र आहेत. त्यामुळे आता इंदिरा गांधी हत्या प्रकरणाशी संबंधित दोन कुटुंबांतील पुढची पिढी पंजाबच्या राजकारणात पुन्हा सक्रिय झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. 
अमृतसरमधील पत्रकार परिषदेत घोषणा

सतवंत सिंह यांच्या उमेदवारीची घोषणा अमृतसरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी अमृतपाल सिंह यांचे वडील आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तरसेम सिंह, तसेच फरीदकोटचे अपक्ष खासदार सरबजीत सिंह खालसा उपस्थित होते.

पक्षाच्या नेतृत्वाने या उमेदवारीकडे केवळ निवडणुकीतील एक तिकीट म्हणून न पाहता, आपल्या राजकीय विचारसरणीशी जोडलेला निर्णय म्हणून मांडलं आहे. पक्षाचा उद्देश केवळ सत्ता मिळवणं नसून पंजाबच्या हक्कांसाठी भूमिका मांडणं आणि अशा कुटुंबांच्या सन्मानाचं रक्षण करणं असल्याचं तरसेम सिंह यांनी म्हटलं.

… तो काळा दिवस
भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात धक्कादायक घटनांपैकी एक म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या. ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी नवी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्या आपल्या अंगरक्षकांच्या गोळीबारात ठार झाल्या.

त्यांचे दोन शीख अंगरक्षक बेअंत सिंह आणि सतवंत सिंह यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर बेअंत सिंह याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सतवंत सिंहला अटक करण्यात आली. या हत्येच्या कटात सहभाग असल्याच्या आरोपावरून केहर सिंह यांच्यावर खटला चालवण्यात आला. त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि ६ जानेवारी १९८९ रोजी तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली.

आता तब्बल चार दशकांनंतर त्यांचा मुलगा सतवंत सिंह निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने १९८४च्या हत्याकांडाची सावली पुन्हा एकदा पंजाबच्या निवडणूक राजकारणावर पडताना दिसत आहे. २०२७च्या विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असला, तरी अमृतपाल सिंह यांच्या गटाने पहिल्याच उमेदवाराच्या घोषणेतून आपली राजकीय दिशा स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.