नवी मुंबई : जीएसटी क्रमांकाची तपासणी आणि क्रेडिटसंदर्भातील नोटीसची चौकशी बंद करण्यासाठी तब्बल 8 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या राज्यकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी राज्यकर उपायुक्त दीपक रामचंद्र क्षीरसागर यांच्याविरोधात सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एसीबीच्या पथकाने त्यांना माझगाव येथील 'जीएसटी भवन' येथून ताब्यात घेतले आहे.
लाचखोर अधिकारी दीपक क्षीरसागर हे यापूर्वी कोकण भवन (नवी मुंबई) येथील विक्रीकर विभागात सहाय्यक आयुक्त (वर्ग-1) म्हणून कार्यरत होते. तक्रारदाराच्या कंपनीला जीएसटी क्रमांकाची स्क्रूटिनी आणि जीएसटी क्रेडिटसंदर्भात राज्यकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस आणि त्यासंबंधीची चौकशी नियमांनुसार निकाली न काढता पूर्णपणे बंद करण्यासाठी क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला 15 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तडजोड करण्याचा प्रयत्न केला, अखेर 8 लाख रुपये देण्याचे ठरले.
एसीबीकडे तक्रार आणि कारवाईचा सापळा
क्षीरसागर यांनी लाचेची रक्कम मागितल्यानंतर तक्रारदाराने तातडीने नवी मुंबई अँटी करप्शन ब्युरो कडे धाव घेतली आणि अधिकृत तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची गुप्तपणे पडताळणी केली असता, क्षीरसागर यांनी कामाच्या बदल्यात 8 लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. लाचेची मागणी सिद्ध झाल्यानंतर नवी मुंबई एसीबीच्या सूचनेनुसार सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात क्षीरसागर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जीएसटी भवनातून ताब्यात
दीपक क्षीरसागर हे माझगाव येथील राज्यकर कार्यालयात उपायुक्त म्हणून पदभार सांभाळयाचे. गुन्हा दाखल होताच एसीबीच्या पथकाने माझगावच्या जीएसटी भवनात छापा टाकून त्यांना थेट कार्यालयातून ताब्यात घेतले.
लाचखोरांचे धाबे दणाणले
एसीबीने अधिकारी क्षीरसागर यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कार्यालयीन तपासासोबतच त्यांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे. शासकीय पदाचा गैरवापर करून व्यापाऱ्यांना आणि करदात्यांना नोटीसचा धाक दाखवून लाच उकळणाऱ्या अधिकाऱ्यांवर झालेली ही कारवाई इतर लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.