🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भीषण थरार! ६ लाख सांगलीकरांचा जीव टांगणीला; १५-२० प्राणीमित्रांसाठी महापालिका प्रशासनाकडून जनतेचा बळी? महासभेत नगरसेवकांचा तीव्र संताप, महापौरांचे कडक आदेश!

भीषण थरार! ६ लाख सांगलीकरांचा जीव टांगणीला; १५-२० प्राणीमित्रांसाठी महापालिका प्रशासनाकडून जनतेचा बळी? महासभेत नगरसेवकांचा तीव्र संताप, महापौरांचे कडक आदेश!


सांगली : शहर परिसरात भटकी कुत्री आणि मोकाट जनावरांच्या वाढत्या आणि जीवघेण्या दहशतीने संपूर्ण सांगली, मिरज आणि कुपवाड थरारले आहे. नागरिकांचा जीव रोज मुठीत धरून जगावा लागत असताना महापालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गुरूवारी भरलेल्या महासभेत नगरसेवकांचा संतापाचा कडकडाट पाहायला मिळाला. अवघ्या १५ ते २० प्राणीमित्रांच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने ६ लाख सांगलीकरांना मोकाट कुत्र्यांच्या आणि जनावरांच्या दाढेत लोटले आहे का, असा थेट आणि आक्रमक सवाल करत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.



​प्रभागात मोकाट वळूच्या धडकेने झालेला नागरिकाचा मृत्यू, वृद्ध महिलेला शिंगाने मारलेली धडक आणि लहान मुलांवर होणारे पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्राणघातक हल्ले यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. "प्राणीमित्रांचा पुळका असणारे प्रशासन माणसांच्या जीवाचा विचार कधी करणार?" असा घणाघाती सवाल स्थायी समिती सभापती अतुल माने यांनी उपस्थित करत प्रशासकीय नाकर्तेपणाचा बुरखा टवकारला. शहरात तब्बल १६ हजार कुत्री मोकाट फिरत असताना डॉग शेल्टरमध्ये मात्र अवघ्या १५० कुत्र्यांची सोय असणे, ही प्रशासनाची सपशेल हलगर्जीपणाची पावतीच आहे.


​या आक्रमक पवित्र्यानंतर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी प्रशासनाला कडक इशारा देत तात्काळ धोरणात्मक आदेश जारी केले:
  • ​कुत्री पकडण्याची मोहीम तत्काळ सुरू करा: भटकी कुत्री पकडणे आणि त्यांची नसबंदी करण्याची मोहीम कोणत्याही परिस्थितीत थांबवता कामा नये.

  • ​ठेकेदाराला नोटीस आणि २ दिवसांचा अल्टीमेटम: पालकमंत्र्यांनी मंजूर केलेल्या अडीच कोटींच्या निधीतून डॉग शेल्टर उभारणीचे काम संथगतीने करणाऱ्या ठेकेदाराला नोटीस बजावून २ दिवसांत काम सुरू करण्याचे थेट आदेश.

  • ​संयुक्त बैठकीचा मुहूर्त: नगरसेवक, महापालिका प्रशासन आणि प्राणीमित्र यांची बुधवारी सकाळी ११ वाजता विशेष संयुक्त बैठक घेऊन अंतिम तोडगा काढणार.

  • ​बंद वाहनांवर जप्तीची कारवाई: शहरात मोकाट कुत्र्यांचे आश्रयस्थान ठरलेली बेवारस आणि बंद वाहने तात्काळ जप्त करणार.

इतर महत्त्वाचे निर्णय आणि प्रशासकीय चाबूक:

  • ​कुपवाडमध्ये डॉ. आंबेडकरांचा पुतळा: सांगली-मिरजेच्या धर्तीवर कुपवाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आणि अभ्यासिका उभारण्यासाठी महापौर आणि उपमहापौर गजानन मगदूम जागेची पाहणी करणार.

  • ​नगररचना विभागाला धारेवर धरले: प्रभाग १२ मधील बाळूमामा मंदिर परिसरातील खुल्या भूखंडावरील बेकायदा बांधकाम तातडीने थांबवण्याचे सहाय्यक संचालक प्रभू यांना कडक निर्देश.
  • ​६ व्या वेतन आयोगाचा फरक रद्द: सेवानिवृत्त शिक्षकांच्या ४ कोटी ३४ लाखांच्या फरकाचा विषय न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत आणि महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये म्हणून फेटाळला.

  • ​गुंठेवारी प्रकरणे: ४,९९१ जुन्या प्रलंबित फायलींचे काम पूर्ण झाल्यानंतरच नवीन प्रमाणपत्रे देणार असल्याचे आयुक्त संजीता महापात्र यांनी स्पष्ट केले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.