सांगलीत खळबळ! कवठेमहांकाळात आर्थिक वादातून २१ वर्षीय तरुणाचा नृशंस खून; कपाळावर आणि पाठीवर सपासप वार
कवठेमहंकाळ :- सांगली जिल्हा पुन्हा एकदा भीषण हत्याकांडाने हादरला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड (एम) येथे एका २१ वर्षीय तरुणाचा अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रणव प्रकाश कदम (वय २१) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे.
धारदार शस्त्राने सपासप वार
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात हल्लेखोरांनी प्रणववर धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्याच्या कपाळावर खोल आणि गंभीर घाव घालण्यात आला असून, छातीवर आणि पाठीवर तब्बल १० ते १२ वार करण्यात आले आहेत. अत्यंत क्रूरपणे केलेल्या या हल्ल्यात प्रणवचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला.
पोलीस घटनास्थळी दाखल
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पाटील यांनी तातडीने कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह ताबडतोब उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टमन) कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
आर्थिक वादातून हत्याकांड?
प्रणवच्या हत्येमागे नेमके काय कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक तपासात आणि तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, हा खून पैशांच्या किंवा आर्थिक व्यवहारातील वादातून झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणाचा पुढील सखोल तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पथक करत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास यंत्रणा वेगाने चक्र फिरवत आहे. भरवस्तीत आणि अशा प्रकारे नृशंसपणे झालेल्या हत्येमुळे अलकुड गावात शोककळा पसरली असून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.