🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कुपवाड दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ २१ ऑगस्टला सांगली-कुपवाड बंद; पडळकरांचा तीव्र इशारा!

कुपवाड दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ २१ ऑगस्टला सांगली-कुपवाड बंद; पडळकरांचा तीव्र इशारा!


सांगली : सांगलीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशात पाठवून दोन-चार एन्कॉउंटर करायला हवेत असे मत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार बैठकीत व्यक्त केले.

सांगली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे का असे विचारले असता, ते म्हणाले, कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस सक्षम आहेत. मात्र गुन्हेगारांच्या वर्चस्ववादातून काही अप्रिय घटना घडत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी गुन्हेगारी मोडीत काढायला हवी. यासाठी दोन-चार गुन्हेगारांचा पोलीस चकमकीत खात्मा झाला तरी चालेल. यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने आम्ही पोलीसांच्या पाठीशी राहूच. यासाठी जिल्ह्यातील काही अधिकार्‍यांना उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचे उच्चाटन कशा प्रकारे केले याचा अभ्यास करण्यासाठी पाठवायला हवे.सांगलीच्या शांततेला बाधा आणणार्‍या गुन्हेगारीवर वचक बसलाच पाहिजे. यासाठी पोलीसांना लोक प्रतिनिधींनी मोकळीक देण्याची गरज आहे. राजकीय हस्तक्षेप जर टाळला तरच हे शयय आहे असेही त्यांनी सांगितले. पोलीसांना त्यांचे काम करण्याची मोकळीक मिळाली तर निश्‍चितच सांगलीची शांतता अबाधित राहील असेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात बांगला देशातून येउन वास्तव्य करणारे लोक आहेत, त्यांचाही शोध पोलीसांनी घेउन त्यांना परत पाठवावे. त्यांच्याकडून समाज विघातक घटना घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, कार्पोरेट जिहादसारख्या घटना महाराष्ट्रात घडत आहेत. याला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कुपवाडमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्यावतीने दि. २१ ऑगस्ट रोजी सांगली, कुपवाड बंदचे आवाहन करण्यात येत असून यादिवशी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून महापालिकेपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुपवाडमधील मोहन केसरेकर व मनिषा केसरेकर या दांपत्याची किरकोळ कारणावरून हत्या झाली. यामुळे दोन मुले अनाथ झाली असून संशयितांने केवळ जातीय त्वेषातूनच हा प्रकार केला असावा अशी शंका यामागे आहे. संशयित केसरेकर कुटुंबाला सातत्याने त्रास देत होता. हे मुलीच्या तक्रारीवरून दिसून येत असून यामागे केवळ दहशत माजवण्याचाच हा प्रकार आहे. या प्रकरणातील संशयिताला फाशीची शिक्षा व्हायला हवी. यासाठी सरकारकडून अ‍ॅड. हर्षद निंबाळकर यांची नियुक्ती व्हावी आणि हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा अशी आमची मागणी आहे. दोन मुले अनाथ असून त्यांना संरक्षण देण्याची गरज आहे. मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासनाने नोकरी द्यावी अशी सकल हिंदू समाजाची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

कुपवाडमधील दुहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी दि.२१ रोजी सांगली व कुपवाड शहरात बंद पाळण्यात येणार असून दुपारी शिवतीर्थ येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये आमदार संग्राम जगताप, आ.महेश लांडगे यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे हेही सहभागी होणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, युवा शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले आदी उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.