🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महिलेचं सीझर करतांना हातमोजे चक्क पोटातच विसरले डॉक्टर! कागदही पोटात विसरला अन् घरी आल्यावर पोटात झाल्या असह्य वेदना; नेमकं काय घडलं?

महिलेचं सीझर करतांना हातमोजे चक्क पोटातच विसरले डॉक्टर! कागदही पोटात विसरला अन् घरी आल्यावर पोटात झाल्या असह्य वेदना; नेमकं काय घडलं?


पुणे: बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड या महिलेवर १ ऑगस्ट रोजी सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

या प्रकारानंतर संध्या यांची प्रकृती गंभीर झाली असून, त्यांच्यावर सध्या पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संध्या यांना सिझेरियननंतर चार दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. घरी गेल्यानंतर त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे सोनोग्राफीसह काही वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांच्या पोटात अनोळखी वस्तू असल्याचे समोर आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

त्यानंतर संध्या यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद बाहेर काढण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे बीड जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संध्या यांचे पती सूरज गायकवाड यांनी संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीची प्रकृती बिघडल्याचा आरोप केला आहे. नवजात बाळाला जन्म दिल्यानंतरही संध्या त्याला जवळ घेण्याच्या स्थितीत नसल्याने कुटुंबीयांवर मोठे संकट ओढावले आहे. 

दरम्यान, या प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबंधित महिला डॉक्टर आणि शस्त्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याची माहिती दिली आहे. प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून, तपासात दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.