सांगली / कडेगाव:
तलवारीचा धाक दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला विटा येथील सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि ५० हजार रुपये दंडाची ठोकठाक शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास आणखी ६ महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे. अजित विजय जाधव (वय ३२, रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजित जाधव याने ०२ सप्टेंबर २०२२ ते २७ जानेवारी २०२३ या कालावधीत पीडित मुलीला तलवारीचा धाक दाखवून रस्त्याच्या कडेला असलेल्या पिकात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, पीडिता आणि तिची आई अंगणात झोपलेली असताना आरोपीने पीडितेचे तोंड दाबून तिला पळवून नेले व पुन्हा अत्याचार केला. या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला पाण्यातून गर्भपाताचे औषध व गोळ्या जबरदस्तीने पाजल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. याप्रकरणी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात ठोस पुरावे व पिडीतेची साक्ष ठरली महत्त्वाची
तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव शिंदे आणि त्यांच्या पथकाने या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुरावे सादर केले.
हे प्रकरण विटा येथील तदर्थ १ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यू. व्ही. इंदापुरे यांच्या न्यायालयात चालले (विशेष केस नं. २७५/२०२४). खटल्यादरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने पीडित मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची व ग्राह्य धरत आरोपी अजित जाधव याला भा.दं.वि. ३७६ सह बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्याच्या कलम ४ व ६ अन्वये दोषी ठरवत २० वर्षांची कडक सक्तमजुरी सुनावली.
पोलीस यंत्रणेचे उत्कृष्ट कोर्ट काम
या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. विनायक देशपांडे यांनी बाजू मांडली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक झाडे यांनी खटल्याच्या सुनावणीवर बारकाईने लक्ष ठेवून मार्गदर्शन केले.
तसेच कोर्ट पैरवी अधिकारी स.पो.नि. मुदस्सर शेख, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे कोर्ट ड्यूटी अंमलदार पो.हे.कॉ. एस. बी. यादव, श्रेणी पीएसआय जितेंद्र कवठेकर, म.पो.ना. एस. एस. जाधव, आणि कोर्ट मॉनिटरिंग सेलचे श्रेणी पीएसआय एस. एल. कलकुटगी व पी. जे. डांगे यांनी या प्रकरणात पाठपुरावा करत मोलाचे सहकार्य केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.