टक्केवारीवरून सांगली महापालिकेत राडा! मंगेश चव्हाणांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती हल्ला; गदारोळातच महापौरांनी सभा गुंडाळल्याचा आरोप
सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महासभेत आज टक्केवारीच्या (कमिशन) मुद्द्यावरून तुफान राडा झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडून सभागृहात कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले. टक्केवारीच्या गंभीर आरोपांवरून खडाजंगी सुरू असतानाच, महापौरांनी गोंधळातच सर्व विषयांना मंजुरी देऊन सभा घाईघाईने गुंडाळल्याचा सनसनाटी आरोप काँग्रेसने केला आहे.
विरोधकांचा तीव्र विरोध आणि गदारोळ चालू असतानाच महापौरांनी अजेंड्यावरील सर्व विषयांना मंजुरी दिल्याचे जाहीर केले. सत्ताधाऱ्यांच्या या दडपशाहीविरोधात विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण प्रचंड आक्रमक झाले. मंगेश चव्हाण यांनी महापालिकेतील कारभारावर आणि टक्केवारीच्या वसुलीवर थेट आसूड ओढत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. "सत्ताधारी भ्रष्टाचारात लिप्त असून चर्चेपासून पळ काढण्यासाठीच त्यांनी घाईघाईत सभा आटोपती घेतली," असा घणाघाती आरोप मंगेश चव्हाण यांनी केला.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरूनही मंगेश चव्हाण आक्रमक; सभागृहात 'रंगकंदन'!
केवळ टक्केवारीच नाही, तर शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवरूनही महासभेत मोठे 'रंगकंदन' पाहायला मिळाले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरल्याचा मुद्दा उपस्थित करत मंगेश चव्हाण यांच्यासह विरोधी सदस्यांनी जोरदार आक्रोश केला. यावरून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.एकीकडे शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असताना आणि दुसरीकडे भ्रष्टाचाराच्या टक्केवारीवरून आरोप-प्रत्यारोप होत असताना, कोणतीही ठोस चर्चा न करता घाईघाईत सभा गुंडाळल्याने सांगलीच्या राजकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.