सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक सतीश पाटील यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन
सांगली :- सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक सतीश रामचंद्र पाटील यांचे रस्ते अपघातात दुर्दैवी निधन झाले. कुपवाड रोडवर झालेल्या या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने बँक क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
सतीश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव, मृदुभाषी व्यक्तिमत्त्व आणि कामातील तत्परता यामुळे त्यांनी सर्वांचीच मन जिंकली होती. बँकेत येणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाशी व कर्मचाऱ्यांशी ते अत्यंत आत्मीयतेने आणि आपुलकीने संवाद साधत असत. त्यांच्या कामाची खास लकब आणि बोलका स्वभाव यामुळे बँक प्रशासनासह सार्वजनिक जीवनात त्यांचा मोठा स्नेहीपरिवार निर्माण झाला होता.
कुपवाड रस्त्यावरून प्रवास करत असताना हा भीषण अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच बँक वर्तुळात आणि त्यांच्या स्नेहीपरिवारावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने मानसिंगराव नाईक यांच्या कार्यालयातील एक विश्वासू व सक्षम सहकारी हरपला असून, कधीही न भरून येणारी हानी झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सतीश पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व बँक कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुखः व्यक्त केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.