पुणे: पुण्यातील म्हाळुंगे परिसरात सोमवारी रात्री एका ११ वर्षीय चिमुकल्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आपल्या वडिलांसह हा चिमुकला ट्यूशनवरून घरी येत असताना अपघात झाला. या अपघातानंतर स्थानिकांमध्ये संताप होता. मात्र, त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने केलेल्या वक्तव्याने आणखीच संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भोर-वेल्हे-मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी स्थानिक आमदारांवर प्रश्नाची सरबत्ती केली. या दरम्यानच माध्यमांशी संवाद साधताना एका प्रश्नावर त्यांनी अत्यंत संतापजनक वक्तव्य केले आहे. "रस्ते आहेत तर अपघात होणारच!" असे बेजबाबदार विधान करत त्यांनी उपस्थितांचा संताप अधिकच वाढवला. इतकेच नाही तर पत्रकारांनी यावर प्रश्न विचारले असता, त्यांनी पत्रकारांनाही दम भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.म्हाळुंगे परिसरात घडलेल्या या भीषण अपघातामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आधीच तीव्र संतापाचे वातावरण होते. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेले आमदार शंकर मांडेकर यांना संतप्त नागरिकांनी थेट जाब विचारण्यास सुरुवात केली. रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळेच निष्पाप बालकाचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांनी केला.प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडेकर यांनी म्हटले की, "अपघात झाल्यावर गुन्हा दाखल होणारच. मी गेल्या दोन वर्षांपासून अधिवेशनात या रस्त्यांबाबत प्रश्न उपस्थित करत आहे. आपण या मुद्यावर मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांची भेट घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.