पीटीआय, नवी दिल्ली : करोना महासाथीच्या काळात आपत्कालीन मदतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या 'पीएम केअर्स' निधीतील देशांतर्गत देणग्यांमध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५मध्ये ३० टक्क्यांची मोठी घट झाली आहे. या वर्षात देशातून ४७९ कोटी रुपये देणगी स्वरूपात जमा झाले. परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांमध्येही १८ टक्क्यांची घट होऊन त्या ९२.८ लाख रुपयांवर आल्या. 'पीएम केअर्स'च्या ताज्या लेखापरीक्षण अहवालातून ही माहिती उघड आली आहे.मात्र, देणग्यांचा ओघ कमी झाला असतानाही 'पीएम केअर्स'मधील एकूण शिल्लक वाढली आहे. ३१ मार्च २०२५ रोजी निधीतील शिल्लक ८,४५२ कोटी रुपये होती. वर्षभरापूर्वी ती ७,१७३ कोटी रुपये होती. यापैकी ७,८४६ कोटी रुपये मुदत ठेवींमध्ये, तर ६०५ कोटी रुपये बचत खात्यांमध्ये ठेवण्यात आले होते.
मुलांसाठीच्या योजनेवरील खर्चात मोठी घट
'पीएम केअर्स' फॉर चिल्ड्रन योजनेवर २०२४-२५ मध्ये केवळ ८७.८५ लाख रुपये खर्च करण्यात आले. मागील वर्षी या योजनेवर १५.३७ कोटी रुपये खर्च झाले होते. एकूणच २०२४-२५ मध्ये निधीतून करण्यात आलेला खर्च ८७.८५ लाख रुपये होता. मागील आर्थिक वर्षात हा खर्च १५.६ कोटी रुपये होता.
करोनाकाळात देणग्यांचा उच्चांक
'पीएम केअर्स'ला मिळणाऱ्या स्वेच्छेच्या देशांतर्गत देणग्यांनी करोनाकाळात मोठा उच्चांक गाठला होता. त्यानंतर हा ओघ कमी होऊ लागला. परदेशातून मिळणाऱ्या देणग्यांमध्येही याच काळात मोठी घट झाली. २०२०-२१मध्ये परदेशातून ४९५ कोटी रुपये मिळाले होते. पुढे २०२१-२२मध्ये हे प्रमाण ४० कोटी रुपये आणि २०२२-२३मध्ये २.५७ कोटी रुपयांवर आले. २०२४-२५ मधील ९२.८ लाख रुपयांची परदेशी देणगी ही २०१९-२० मधील ३९.७ लाख रुपयांनंतरची दुसरी सर्वांत कमी देणगी ठरली.
आपत्कालीन मदतीसाठी निधी
कोरोनासारख्या आपत्कालीन आणि संकटाच्या परिस्थितीत नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने नरेंद्र मोदी सरकारने 'पीएम केअर्स' निधीची स्थापना केली. हा निधी सार्वजनिक धर्मादाय न्यास म्हणून नोंदणीकृत आहे. पंतप्रधान या निधीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. या निधीला पूर्णपणे ऐच्छिक देणग्यांमधून पैसा मिळतो आणि त्याला केंद्राच्या अर्थसंकल्पातून कोणतीही आर्थिक मदत दिली जात नाही. २०२१-२२ मध्ये केवळ प्रेशर स्विंग ॲडसॉर्प्शन (पीएसए) ऑक्सिजन प्रकल्पांसाठी १७०३ कोटी रुपये, तर व्हेंटिलेटरसाठी ८३५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. त्या वर्षातील एकूण खर्च सुमारे १९३८ कोटी रुपये होता.देशांतर्गत देणग्यावर्ष कोटी रुपये२०२०-२१- ७,१८४२०२१-२२- १,८९६२०२२-२३- ९०९२०२३-२४ -६८१.८२०२४-२५ -४७९
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.