चन्नी, ता. पातूर - माळसूर येथील बिअर शॉपीला वाईन बारचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्याच्या मोबदल्यात ६५ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीनंतर ३५ हजार रुपये स्वीकारणाऱ्या चान्नी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांना अकोला व वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने मंगळवारी (ता.१८) रंगेहात पकडले. चान्नी पोलिस ठाण्यातच झालेल्या या कारवाईमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे.
माळसूर येथील बिअर शॉपीचे मालक शुभम थिटे यांना त्यांच्या व्यवसायासाठी वाईन बारचा परवाना मिळवायचा होता. त्यासाठी आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक महादेव देशमुख यांनी थिटे यांच्याकडे कथितरीत्या ६५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
लाचेची रक्कम अधिक असल्याने तक्रारदाराने तडजोडीची भूमिका घेतल्यानंतर ३५ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. त्यानंतर शुभम थिटे यांनी या प्रकाराची माहिती अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देत तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने कारवाईचे नियोजन केले.ठरल्याप्रमाणे १८ ऑगस्ट रोजी चान्नी पोलिस ठाण्यात तक्रारदाराकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने महादेव देशमुख यांना रंगेहात पकडले. अकोला व वाशिम एसीबीच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली. लाचेची रक्कमही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.या कारवाईनंतर चान्नी पोलिस ठाण्यातील वातावरणात एकच खळबळ उडाली. पोलिस विभागातील अधिकारीच लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकल्याने या प्रकरणाची चर्चा परिसरात सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी चान्नी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. लाचेची मागणी, व्यवहाराची पार्श्वभूमी आणि या प्रकरणाशी संबंधित अन्य बाबींचा एसीबीकडून तपास करण्यात येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.