🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फाशीऐवजी विषारी इंजेक्शन? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!

फाशीऐवजी विषारी इंजेक्शन? सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय!


मृत्युदंडाची शिक्षा देण्यासाठी फाशीऐवजी कमी वेदनादायी दुसरा एखादा पर्याय दिला जावा, यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे. फाशीचा पर्याय हा वेदनादायी असून यापेक्षा विषारी इंजेक्शन किंवा इतर पर्यायावर विचार केला जावा, अशी याचिका करण्यात आली होती. 
मात्र न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी फाशीचा पर्याय हाच वैध असेल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. सर्वोच्च न्यायालयाने इतर शिक्षेच्या पद्धतींना विरोध केला असला तरी जर कमी वेदनेच्या शिक्षेला एखादा वैज्ञानिक किंवा वैद्यकीय पुरावा मिळाल्यास त्याचा विचार करण्यात येईल, असेही न्यायालयाने सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आणि कमी वेदनेच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेच्या पर्यायावर विचार करण्याचे आवाहन केले.
फाशीच्या विरोधात याचिका का दाखल झाली?

ज्येष्ठ वकील ऋषी मल्होत्रा हे २०१७ सालापासून फाशीच्या शिक्षेविरोधात याचिकेच्या मार्गाने लढत आहेत. “मृत्युदंडाची शिक्षा सन्मानपूर्वक मिळणे, हादेखील व्यक्तीचा अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीचे जीवन अशा शिक्षेमुळे संपत असेल तर ती शिक्षा वेदनारहित असली पाहिजे. अनेक देशांमध्ये फाशीची शिक्षा आता दिली जात नाही. अमेरिकेतील ३६ राज्यांनी फाशीची शिक्षा देणे बंद केले आहे”, असा युक्तिवाद मल्होत्रा यांनी यापूर्वीच केला होता.

याचिकेच्या माध्यमातून मल्होत्रा यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (CrPC) कायद्यातील कलम ३५४ (५) च्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले. या कलमानुसार शिक्षेची तरतूद अशी आहे, "जेव्हा एखाद्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते, तेव्हा त्याच्या गळ्यात दोर लटकवून मरेपर्यंत फासावर लटकवावे," असे निर्देश या कलमांतर्गत देण्यात आले आहेत.
मल्होत्रा यांनी फाशीच्या शिक्षेऐवजी विषारी इंजेक्शन, गोळीबार, विजेचा धक्का आणि गॅस चेंबर यासारख्या इतर पद्धतींचा वापर करण्याची मागणी केली होती. फाशीमुळे मृत्यू येण्यासाठी जवळपास ४० मिनिटे लागतात. त्यानंतर डॉक्टर येऊन मृत्यू झाला की नाही, याची तपासणी करतात. हा पर्याय खूप अमानवीय आहे. यापेक्षा विषारी इंजेक्शन, गोळी झाडणे किंवा विजेचा धक्का देऊन काही मिनिटांतच व्यक्तीचा मृत्यू होतो, अशा पर्यायांवर विचार झाला पाहिजे, अशी मल्होत्रा यांची मागणी होती.
लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार, मार्च २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाधिवक्ता आर. वेंकटरमानी यांना फाशीच्या शिक्षेनंतर होणाऱ्या वेदनेची माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले होते. फाशी दिल्यानंतर मृत्यू होण्यासाठी किती वेळ लागतो किंवा या पद्धतीशी निगडित इतर कोणते मुद्दे आहेत, हेदेखील तपासण्याचे आदेश देण्यात आले होते.

फाशीची शिक्षा रद्द करण्यास विरोध का?
खंडपीठातील न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांनी म्हटले की, फाशीच्या शिक्षेच्या वापराला मान्यता देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी याचिकाकर्त्याने पुरेसे कारण दिलेले नाही. दिना प्रकरणातील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यासाठी पुरेसा पुरावे असे आम्हाला वाटत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, खंडपीठाने पुढे म्हटले की, पूर्वीच्या निर्णयातील तथ्ये बदलली असल्याचे ठोस वैज्ञानिक आणि वैद्यकीय पुरावे दिसून आलेले नाहीत. फाशीची शिक्षा वैध आहे की नाही, या प्रश्नावर भविष्यात विचार केला जाऊ शकतो. विज्ञानातील बदल आणि नवीन घडामोडी लक्षात घेऊन संविधानाचा अर्थ लावला पाहिजे, असेही खंडपीठाने म्हटले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.