स्वतःच्या पोटावर वार झेलून पोलीस अंमलदाराचे शौर्य! मिरजेत एसटी चालक-वाहकावरील जीवघेणा हल्ला परतवला; दोन सराईत गुन्हेगार जेरबंद
मिरज :-रस्त्यात एसटी बस अडवून चालकाला मारहाण करणाऱ्या आणि वाहकावर (कंडक्टर) धारदार कोयत्याने हल्ला करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने जेरबंद केले. या झटापटीत एका आरोपीने केलेल्या कोयत्याच्या वारात पोलीस अंमलदार कोंडीबा सरगर हे गंभीर जखमी झाले. मात्र, पोटावर वार झाला असतानाही जखमी अवस्थेत त्यांनी न डगमगता सहकाऱ्याच्या मदतीने दोन्ही गुन्हेगारांना जागीच पकडले आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले.
मार्केट यार्ड गेटसमोरील थरार
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:०० वाजेच्या सुमारास मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील मार्केट यार्ड गेटसमोर दोन इसम हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजवत होते. त्यांनी एक एसटी बस अडवून तिच्या काचा फोडल्या आणि वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले, तर चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.
जीवाची पर्वा न करता आरोपींना ठोकल्या मुसक्या
त्याच वेळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बीट मार्शल पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर आणि धनंजय घुबडे हे पेट्रोलिंग करत त्या परिसरात पोहोचले. त्यांनी तत्काळ आरोपींची ओळख पटवली; त्यातील एक जण पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अब्दुलरेहमान अख्तर पटेल हा होता. घटनेचे गांभीर्य ओळखून, आरोपींकडे धारदार शस्त्रे असतानाही दोन्ही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्यांच्यावर झेप घेतली.
या झटापटीत आरोपीने पोलीस कॉन्स्टेबल कोंडीबा सरगर यांच्या पोटावर धारदार कोयत्याने वार केला. गंभीर दुखापत झाली असतानाही सरगर यांनी कमालीची समयसूचकता व शौर्य दाखवत आरोपींना निसटण्याची संधी दिली नाही आणि दोन्ही हत्यारबंद आरोपींना ताब्यात घेतले.
दोन स्वतंत्र गुन्हे दाखल, एसटी महामंडळाकडून सत्कार
या प्रकरणी सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
अब्दुलरेहमान अख्तर पटेल (पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार)
सैफुल्ला अख्तर पटेल (दोघे रा. उस्मानिया मोहल्ला, भारतनगर, मिरज)
या घटनेबाबत एसटी चालक परमेश्वर लामकानी यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. २७७/२०२६ (भारतीय न्याय संहिता) आणि पोलीस कॉन्स्टेबल धनंजय घुबडे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं. २७८/२०२६ अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे आणि पोलीस उपनिरीक्षक बसवराज हर्डीकर करत आहेत.
पोलीस अंमलदार कोंडीबा सरगर यांच्या या अतुलनीय धाडसाचे आणि कर्तव्यदक्षतेचे सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या मिरज आगारातर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.